विश्वास पाटील, कोल्हापूर : नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासात विविध आजाराने झालेले २४ मृत्यू ही बाब गंभीर आहे. याची माहिती घेवून चौकशी समिती नेमू. यामध्ये दवाखान्यातील वैद्यकीय अधिकार्यांकडून हलगर्जीपणा दिसून आल्यास त्यांच्यावर कारवाई करु, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पञकारांशी बोलताना स्पष्ट केले. उद्या मंगळवारी तीन दुपारी मंत्री मुश्रीफ स्वतः नांदेड रुग्णालयास भेट देवून माहिती घेणार आहेत.
नांदेड येथील शासकीय रुग्णालयात रोज दीड हजारांहून अधिक बाह्यरूग्ण उपचारासाठी येतात. वाशीम, परभणी, मेघोली आणि तेलंगणाच्या सीमाभागातून येथे रुग्ण येतात. तसेच, येथे सर्व विभागांचे डाँक्टरसह सर्वच पुरेसा स्टाफ असून २०-२० बेडचे दोन अतिदक्षता विभागही कार्यान्वित आहेत. खाजगी रुग्णालयात वाढत्या बिलामुळे अनेक रुग्ण तेथून शासकीय रुग्णालयात येत असल्याचेही समोर आले आहे. गेल्या २४ तासात मृत्यू झालेल्यांमध्ये १२ बालरुग्ण, २ विषबाधेने, गंभीर आजार असणारे अतिदक्षता विभागात उपचार घेणारे सात, तर हद्यविकाराने दोघांचा आणि प्रसृतीदरम्यान गुंतागुंत होवून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाचे आयुक्त राजीव निवतकर आणि संचालक मिलिंद म्हैसेकर यांना तात्काळ पाठवून दिले आहे.
तर खाजगी दवाखान्यांसाठी नियमावली
खाजगी रुग्णालयात एखादा रुग्ण दाखल झाल्यानंतर बिलांवरून त्यांच्यावरील उपचारामध्ये खंड होवू नये, यासाठी सार्वजनिक आरोग्यमंञी तानाजी सावंत यांच्याशी चर्चा करून खाजगी रुग्णालयांसाठी नियमावली बनवून त्यांच्यावरही अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्न करणार, असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.