मलकापूर :
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला शाहूवाडी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद असून सर्वत्र शुकशुकाट आहे तर पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी तालुक्यातील प्रमुख ठिकाणी बंदोबस्त कडक ठेवला आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला असून तालुक्यातील प्रमुख गावे असलेल्या बांबवडे, सरुड, मलकापूर, आंबा, येथील बाजारपेठेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. कामाशिवाय रस्त्यावर येणाऱ्यांची कसून चौकशी केली जात असून विनाकारण फिरत असलेल्यांच्या स्वॅब तपासणीची मोहीम हाती घेतल्याने अनेकांनी धसका घेतला आहे.
लॉकडाऊनला दिलेला पाठिंबा यापुढेही असाच ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, होमगार्ड व खाजगी सुरक्षा रक्षक यांनी तालुक्यातील विविध ठिकाणी बंदोबस्त कडक ठेवल्याने रस्त्यावर येणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
फोटो
शाहूवाडी तालुक्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने मलकापूर येथे वाहनाची चौकशी करून कारवाई करण्यात आली.