जयसिंगपूर : सलग पाचव्यादिवशी नियम मोडणाऱ्यांवर जयसिंगपूर पोलिसांकडून कारवाईचा बडगा सुरूच राहिला. कडक लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्तीची मोहीम गुरुवारीदेखील सुरूच होती. दरम्यान, मॉर्निंगवॉकसाठी आलेल्या नागरिकांवरही कारवाई करण्यात आली.
कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असल्याने संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रविवारपासून कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईबरोबरच वापरत असलेले वाहन लॉकडाऊन संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत ताब्यात घेण्याची मोहीम शहरात सुरू आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका, असे प्रशासन वारंवार सांगत असतानाही मेडिकल, रुग्णालय अशी कारणे सांगून लोक बाहेर फिरत आहेत. त्यामुळे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा सुरूच ठेवला आहे.
जयसिंगपूर येथे क्रांती चौकात पोलिसांचे पथक सकाळपासून तैनात असते.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरूआहे. कडक लॉकडाऊन असतानाही अनेक नागरिक सकाळी मॉर्निंगवॉकसाठी बाहेर पडत आहेत. त्यांच्यावर जयसिंगपूर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. गुरुवारी मॉर्निंगवॉकसाठी फिरणाºया नऊजणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला; तर दुकाने उघडणाऱ्यांकडून दोन हजार रुपयांचा दंड व विनामास्क फिरणाऱ्यांच्याकडून साडेचार हजाराचा दंड वसूल करण्यात आला.
फोटो - २००५२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील क्रांती चौकात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. (छाया- अजित चौगुले, उदगाव)