सरुड येथे गणेशोत्सव तरुण मंडळाची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
सरूड : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मंडळांनी शासनाच्या नियमांचे व सूचनांचे पालन करून येणारा गणेशोत्सव सण शांततेत साजरा करावा. शासनाच्या नियमांचे व सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या तरुण मंडळावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिला आहे.
सरुड (ता. शाहूवाडी) येथे आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
पाटील म्हणाले, कोरोना व महापुराच्या संकटामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. त्यामुळे वर्गणीसाठी कोणावरही जबरदस्ती न करता अनावश्यक खर्चाला फाटा देत हा सण साजरा करा. अद्यापही कोरोनाचे संकट दूर झालेले नाही. अशा परिस्थितीमध्ये तरुण मंडळांनी गर्दीवर नियंत्रण राखत कोरोनाचा पुन्हा उद्रेक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यासाठी सर्व तरुण मंडळांनी गणेशोत्सव काळात शासनाच्या सूचनांचे व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
या बैठकीला उपसरपंच भगवान नांगरे, माजी सरपंच उत्तम पाटील, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय रोडे, डॉ. राजेंद्र पाटील, पोलीस पाटील दीपाली घोलप, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख अलका भालेकर, गोपनीय विभागाचे काँ. दिगंबर चिले, हेडकॉन्स्टेबल अशोक माने आदींसह गावातील सुमारे ४० तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.