कोल्हापूर : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टोलसाठी असलेली स्थगिती उठविली. त्यांच्याकडून टोलच्या निर्णयाची अपेक्षा नाही. केंद्रात राजकीय ताकद वापरून फक्त शरद पवारच कोल्हापूरचा टोल प्रश्न मिटवू शकतात, असा युक्तिवाद करत सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या सदस्यांनी पवारांच्या मंगळवारी (दि. १६) कोल्हापूर दौऱ्यावेळी विशेष भेटीचे आयोजन करण्याची विनंती खासदार धनंजय महाडिक यांना आज, शुक्रवारी केली. टोल हा एका दिवसात मिटणारा प्रश्न नाही तरीही पवार यांना दोन-तीन पर्याय देऊ, कृती समितीतर्फे हो किंवा नाही, असे स्पष्ट विचारू, असे सांगून मी कृती समितीसोबतच असल्याचा निर्वाळा महाडिक यांनी यावेळी दिला.धार्मिक स्थळांच्या आधार घेत म्हैसूर, काशी, अहमदाबाद, नाशिक या शहरांवर हजारो कोटी रुपयांच्या निधीची बरसात झाली. महालक्ष्मीचे वास्तव्य असूनही कोल्हापूर मात्र उपेक्षितच राहिले आहे. यापूर्वीच पवारांनी यामध्ये लक्ष घालणे गरजेचे होते, अशी खंत चंद्रकांत यादव यांनी व्यक्त केली. सत्ता नाही तरीही राजकीय दबावाचा वापर करत पवार केंद्रातून कोल्हापूरसाठी निधी आणू शकतात. याबाबतचे कृती समितीचे नेतृत्व आपण करावे, अशी विनंती खा. महाडिक यांना कार्यकर्त्यांनी केली. बाबा इंदूलकर बाबा पार्टे, अशोक पोवार, दिलीप पवार, जयकुमार शिंदे, वैशाली महाडिक, सुजाता चव्हाण, सुचिता साळोखे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कृती समितीने घेतली धनंजय महाडिक यांची भेट
By admin | Published: September 13, 2014 12:46 AM