कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन करून लग्नकार्यासाठी ५० पेक्षा अधिक लोक जमविल्याप्रकरणी आंबेवाडी (ता. करवीर) येथील दत्त समर्थ मंगल कार्यालयावर सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी कारवाई केली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कार्यक्रमांसाठी ५० पेक्षा अधिक लोक एकत्र येऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बंदी आदेश दिला. आंबेवाडी येथील दत्त समर्थ मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यासाठी ५० पेक्षा अधिक लोक एकत्र येऊन बंदी आदेश झुगारल्याबद्दल त्यांच्यावर मंगळवारी दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई केली होती; पण दुसऱ्याच दिवशी बुधवारी पुन्हा याच दत्त समर्थ मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यासाठी विनापरवाना मोठ्या संख्येने लाेक एकत्र आल्याचे समजताच करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर यांनी पथकासह तेथे जाऊन तपासणी केली, तसेच कार्यालयाचे मालक दीपक रामचंद्र कचरे (वय ४०, रा. वडणगे), प्रकाश सदाशिव पाटील (६५, रा. भादोले, ता. हातकणंगले) यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.