एकोंडी येथील गट नंबर २०७अ/१ मध्ये ७.५७हेक्टर इतकी गायरान जमीन आहे. येथील अनिल खाडे यांनी एक महिन्यापूर्वी बांधकाम करण्यासाठी पाया खुदाई केली होती. याबाबत ग्रामपंचायतीकडून ग्रामसेविका शीतल पाटील यांनी शासकीय जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे बांधकाम करीत आहात, ते थांबवा. अशा सूचना दिल्या होत्या. त्याला दाद न देता त्यांनी बांधकाम तसेच पुढे सुरू ठेवले. त्यामुळे कागल पोलिसांमध्ये खाडे यांच्यावर शासकीय जागेत बेकायदेशीरपणे पूर्वपरवानगीशिवाय अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे अधिक तपास करीत आहेत. याबाबत ग्रामसेविका शीतल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या, यानंतर शासकीय जागेत कोणालाही अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे बांधकाम करता येणार नाही. तसा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
सरपंच पूनम सुळगावे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये गावात होत असलेले शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे रोखण्याबाबत ठराव करण्यात आला आहे. नवीन होणारे अतिक्रमणे थांबविण्यासाठी कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगितले .
छायाचित्र - 1) एकोंडी (ता कागल) येथे शासकीय गायरान जमिनीमध्ये अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे सुरू असलेले बांधकाम.2) ग्रामपंचायतीने कारवाई केल्यानंतर पोलिसांनी येऊन पाहणी केली आणि गुन्हा नोंद केला