कोल्हापूर : गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. गुन्हे दाखल न करता काही प्रकरणे परस्पर मिटविली जातात. त्यातून पुढे मोठ्या प्रकारचे गुन्हे घडतात असे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी बुधवारी येथे दिला.
ते म्हणाले, प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला सर्वप्रकारचे अहवाल आणि गुन्हे दाखल करण्यासाठी लागणारी प्रक्रिया माहिती हवीच. त्यांनी पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीची नोंद घेऊन गुन्हे दाखल केले पाहिजेत तसे न करता प्रकरण परस्पर मिटविण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. अशी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. यामध्ये निलंबन ते बडतर्फीपर्यंतच्या कारवाईचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांत अशा तिघांना बडतर्फ करण्यात आले आहे. एका कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.
पोलीस दलात गणवेशाचा मान वेगळाच आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी खाकी गणवेश सक्तीचा करण्यात आला आहे. यातून केवळ विशेष व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी एक दिवस गणवेश सक्तीचा करण्यात आला आहे. यासह सर्व पोलीस ठाण्यातील क्राईम काॅन्स्टेबलनाही यातून वगळण्यात आले असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.