- चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : हमीभावापेक्षा कमी दराने साखरेची विक्री केल्यास, तसेच कोटा मर्यादेचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा केंद्र सरकारने साखर कारखान्यांना दिला आहे. तसेच याचे काटेकोरपणे पालन होते की नाही यावर लक्ष ठेवून आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचनाही संबंधित राज्यांना देण्यात आल्या आहेत.अनेक साखर कारखान्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने साखर विक्री सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने शुक्रवारी सर्व साखर कारखाने, साखर आयुक्त आणि ऊस आयुक्तांना पाठविलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, साखर कारखान्यांना एफआरपीप्रमाणे दर देता यावा. त्यांच्याकडील रोखता वाढावी यासाठी ७ जून २०१८ रोजी कारखान्यांसाठी साखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आला आहे. तसेच बाजारातील मागणी पुरवठ्याचा समतोल साधला जावा यासाठी खुल्या बाजारात किती साखर विकायची यासाठी प्रत्येक कारखान्याला दरमहा कोटा आणि साठामर्यादा ठरवून देण्यात आली आहे.त्यामुळे देशातंर्गत बाजारपेठेत किमान विक्री दरापेक्षा कमी दराने साखर विक्री करू नये, तसेच देण्यात आलेल्या मासिक कोटा आणि साठा मर्यादेचे उल्लघंन करू नये. राज्य सरकारांनीही यावर देखरेख ठेवावी याचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांवर जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ मधील तरतुदीनुसार कारवाई करावी.कोटा मर्यादेचे उल्लघंन केल्यास ....कारखान्यांनी त्यांना देण्यात आलेल्या कोट्यापेक्षा जादा साखर विकल्याचे आढळून आल्यास पुढील महिन्याच्या कोट्यातून ती साखर कमी केली जाईल. तसेच आवश्यक ती अन्य कारवाईही केली जाईल. मार्च महिन्यापासून याची अंमलबजावणी केली जाईल, असेही या आदेशात म्हटले आहे.
हमीभावापेक्षा कमी दराने साखर विकल्यास कारवाई; केंद्राचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 7:20 AM