कोल्हापूर : रासायनिक खतांचे लिंकिंग होत असल्याच्या तक्रारी येत असून, असे प्रकार ज्या कार्यक्षेत्रात आढळतील, तेथील कृषी निरीक्षकावर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिला. शेतकऱ्यांना योग्य दरात खते, बियाणे मिळतात की नाही, हे तपासणीची जबाबदारी कृषी विभागाची असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड मान्य नसून, शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी शासकीय विश्रामगृहात कृषी विभागाची आढावा बैठक झाली, त्यामध्ये ते बोलत होते. खरीप हंगामासाठी तीन हजार टन युरिया जादा येऊनही शेतकऱ्यांची ओरड संपली नाही. आता आपल्याकडे ९०० टन युरिया शिल्लक असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी सांगितले.
भुदरगड तालुक्यात युरिया उद्दिष्टाच्या तुलनेत ३५० टक्के आला, मात्र दुकानात नाही; मग तो गेला कोठे? विक्रेते जाणीवपूर्वक साठा करीत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली. खतावरील लिंकिंगबाबत राज्यस्तरीय आदेश काढावेत, अशी सूचना केली.
गेली चार वर्षे कोल्हापूर व सांगलीतील १७ हजार शेतीपंपांची वीजजोडणी प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित करीत ठिबकसाठी आपण आग्रही राहतो. मात्र त्याचे अनुदान वेळेत मिळत नसल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले.
महापुरातील कर्जमाफीचा लाभ संयुक्त खातेदारांना मिळावा, त्याचबरोबर लाटवडे, भेंडवडे परिसरांत झालेल्या गारपिटीमुळे शेतीसह पोल्ट्री उद्योगाचे नुकसान झाले, त्याची भरपाई मिळावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली. मिश्रखतास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी केली. यावर काही संस्थांमुळे गालबोट लागले असले तरी चांगल्या संस्थांसाठी निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही भुसे यांनी दिली.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, ह्यआत्माह्णच्या संचालक सुनंदा कुराडे, जिल्हा उपनिबंधक अमर शिंंदे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने, आदी उपस्थित होते. कृषी उपसंचालक भाग्यश्री पवार यांनी आभार मानले.