कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या महापौर तृप्ती माळवी लाच घेताना सापडल्या याचे कधीच समर्थन करणार नाही, असे व्यासपीठावरून जाहीरपणे ठासून सांगितले तरी अप्रत्यक्षपणे आमदार हसन मुश्रीफ यांनी माळवी यांचीच पाठराखण केल्याचे सोमवारी अनुभवास आले. राष्ट्रवादी काँग्रेसला जाणीवपूर्वक बदनाम केले जात असल्याची शंका उपस्थित करून लाच कारवाईच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावले. शाहू सांस्कृतिक भवनमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.मुश्रीफ म्हणाले, ‘‘महापौरांनी लाच घेतल्याचे अजिबात समर्थन करणार नाही. त्यांचा पक्षाने राजीनामा घेतला आहे. नोटीसही पाठविली आहे. याप्रकरणात महापौरांचे व्हाईस रेकॉर्डिंग झाल्याचे लाचलुचपत विभाग सांगत आहे. रेकॉर्डिंग तपासण्यासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठविले आहे. तो अहवाल कधी येणार? त्या निर्दाेष असल्याचे सिद्ध कसे व कधी होणार, असे अनेक प्रश्न आहेत. माळवी यांच्या पतीचा खून झाला. त्या खटल्याची सुनावणी सुरू होत आहे. यातूनच हे कुभांड रचले असावे, असे माळवींचे म्हणणे आहे. याचाही विचार व्हायला हवा.’’पथक आजही रिकाम्या हाताने परतमहापौर माळवी यांचा रक्तदाब कमी-जास्त होत असल्याने त्यांची प्रकृती अद्याप स्थिर नसल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांना अटक करण्यासाठी गेलेले लाचलुचपत विभागाचे पथक पुन्हा रिकाम्या हाताने परतले. दरम्यान, महापौर माळवी यांच्यातर्फे अॅड. प्रशांत देसाई यांनी अटकपूर्व जामीन मंजुरीचा अर्ज विशेष जिल्हा न्यायाधीश के. डी. बोचे यांच्याकडे सादर केला. यावेळी न्यायाधीश बोचे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तपासी अधिकारी उदय आफळे व पद्मा कदम यांना चौकशी अहवाल आज, मंगळवारी सादर करण्याचे आदेश दिले. पाकीट संस्कृती..महानगरपालिकेच्या निवडणुकीत पाकीट संस्कृती बंद करू असे आश्वासन दिले होते. शंभर टक्के बंद करता आली नाही. परंतु, वचक ठेवला. प्रसारमाध्यमांनी पाहरेकऱ्यांची भूमिका बजावावी, निदर्शनास आणून द्यावे, असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.
कारवाईची भाषा अन् पाठराखणही
By admin | Published: February 03, 2015 12:41 AM