कोल्हापूर : मराठा दाखल्यांसाठी सहकार्य न करणाऱ्या महा-ई-सेवा केंद्रचालकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा करवीरचे तहसीलदार सचिन गिरी यांनी येथे दिला.शाहू स्मारक भवन येथे अ. भा. मराठा महासंघातर्फे मराठा व तत्सम जात दाखला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक होते. प्रमुख उपस्थिती महा-ई-सेवा केंद्रचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पिराजी संकपाळ, प्रकाश पाटील, प्रताप नाईक, चंद्रकांत चव्हाण, शरद साळुंखे, विजय काकोडकर, दिलीप मिसाळ, शैलजा भोसले, आदींची होती.यावेळी तहसीलदार गिरी यांनी उपस्थित पालकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. योग्य कागदपत्रे सादर केल्यास मराठा जात दाखले तत्परतेने दिले जातील. त्यासाठी आम्ही बांधिल असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकांनी महा-ई-सेवा केंद्रचालकांकडून मराठा दाखल्यांसंदर्भात सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी मांडल्या. यावर सहकार्य न करणाºया केंद्रचालकांवर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार गिरी यांनी दिला.पिराजी संकपाळ यांनी जात दाखला काढण्याची माहिती अत्यंत सुलभ पद्धतीने व सोप्या भाषेत दिली. केंद्र सरकारच्या नोकरीसाठी १० टक्के आरक्षण लागू असून, त्यासाठी दाखला काढण्याबाबत, तसेच सीमावासीयांच्या दाखल्याबाबतही माहिती दिली. मराठा जात (एसईबीसी) दाखला काढण्यासाठी १३ आॅक्टोबर १९६७ पूर्वीचा (रहिवासी पुरावा म्हणून) सात-बारा, प्रॉपर्टी कार्ड, महापालिकेचा अॅसेसमेंट उतारा, खरेदी दस्त, घरभाडे पावती, आदी कागदपत्रे ग्रा' धरण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.वसंतराव मुळीक यांनी मराठा जात दाखल्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत मराठा महासंघाशी संपर्क साधण्याचे आवाहन समाजबांधवांना केले. यावेळी विजय काकोडकर यांनी स्वागत केले. दिलीप मिसाळ यांनी प्रास्ताविक केले. तर अवधूत पाटील यांनी आभार मानले.