कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने पुकारलेल्या संचारबंदी आदेशाचा भंग करणाऱ्या १०८४ वाहनांवर शहरात शनिवारी दिवसभरात कारवाई केली. त्यापैकी ६० वाहनांवर जप्तीची कारवाई केली असून, उर्वरित १०२४ वाहनधारकांकडून एक लाख ५६ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय मॉर्निंग वॉकसाठी बाहेर फिरणाऱ्या ६० जणांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत गेल्या तीन दिवसांपासून संचारबंदी आदेश पुकारण्यात आला आहे. त्या कालावधीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी पोलीस व महापालिकेचे कर्मचारी अशी कारवाईची संयुक्त मोहीम राबवली जात आहे. शनिवारी शहरात विविध ठिकाणी मॉर्निंग वॉक करणाऱ्या ६० जणांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. याशिवाय शहरात विनामास्क फिरणाऱ्या १५ जणांकडून साडेसात हजार रुपये दंड वसूल केला. दिवसभरात शहरातील आदेशाचा भंग करून विनाकारण फिरणाऱ्या १०२४ वाहनधारकांकडून एक लाख ५६ हजार १०० रुपये दंड वसूल केला; तसेच ६० दुचाकी वाहने जप्त केली. ही वाहने त्यांना संचारबंदी कालावधीनंतर कारवाई करून परत करण्यात येणार आहेत. शहरातील चारही पोलीस ठाण्यांकडून व शहर नियंत्रण वाहतूक शाखेकडून ही कारवाई करण्यात आल्याचे शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
पोलीस स्टेशननिहाय शनिवारची कारवाई
पोलीस स्टेशन : विना मास्क - वाहतूक संख्या - दंड रु.
लक्ष्मीपुरी : ०४ - १६३ - ३४,०००
जुना राजवाडा : ०४ - १२७ - २८,५००
शाहूपुरी : ०२ - १७ - ३४,०००
राजारामपुरी : ०१ - ४८- १०,००
शहर वाहतूक शाखा : - - ७९६ - ४९,६००