कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाईचे शस्त्र उगारले जात आहे. बुधवारी शहरात सुमारे ९८ विनामास्क नागरिकांवर, तर सुमारे साडेसहाशे वाहनांवर कारवाई करण्यात आली. पोलीस दलातर्फे ही कारवाई केली जात असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नागरिकांना निर्बंध घालून दिले आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले आहेत. शहरात पोलिसांच्यावतीने अशा निर्बंध न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. शहरात बुधवारी एकादिवशी सुमारे साडेसहाशे दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये शहर वाहतूक शाखेने ५४५ वाहनांवर, तर जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६, लक्ष्मीपुरी पोलीस हद्दीत १५, शाहूपुरी पोलीस हद्दीत ४४, राजारामपुरी पोलिसांच्या हद्दीत २२ वाहनांवर कारवाई केली. शहरातील चारही पोलीस ठाण्यांमार्फत वाहतूकदारांकडून दिवसभरात २७ हजार ५०० रुपये दंड वसूल केला.
विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवरही जागेवरच दंडात्मक कारवाई केली जात आहे. दिवसभरात ९८ जणांवर विनामास्कची कारवाई करून त्यांच्याकडून ५० हजार रुपये दंड वसूल केला. याशिवाय सोशल डिस्टन्स व विनापरवाना दारूबंदीविरुध्दही कारवाई करण्यात येत आहे.