त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबत ५ ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवली आहे. ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी यांच्यात खळबळ उडाली असून ग्रामस्थांचे या सुनावणीकडे लक्ष लागून राहिले आहे.
पट्टणकोडोली येथील पाचगाव पाणीपुरवठा योजनेचे स्क्रॅप मटेरिअल ग्रामपंचायतीने अनधिकृतपणे विक्री करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याची तक्रार शब्बीर मुल्लाणी व विजयसिंह रजपूत यांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र, दोषींवर कोणतीच कारवाई न झाल्याने तक्रारदारांनी २ जुलै २०१९ रोजी उपलोकायुक्त यांच्याकडे दाद मागितली होती. त्यानुसार तक्रारदारांचे म्हणणे ग्राह्य मानून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अहवाल मागणीचे आदेश दिले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार नळपाणीपुरवठा योजनेच्या साहित्याची नियमबाह्य पद्धतीने विक्री करण्यात आल्याचे व अनियमितता झाल्याचे आढळून येते. यास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत कार्यकारिणी व ग्रामविकास अधिकारी हे सकृतदर्शनी जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुणे विभागीय आयुक्त यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.