कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांतील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी आराखडा तयार करूया. विद्यार्थी, शिक्षकांच्या मदतीने पर्यावरण क्षेत्रातील व्यक्ती, कार्यकर्ते, संघटना, प्रदूषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका यांच्या माध्यमातून हा आराखडा राबवूया. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून, कोल्हापूरची हवा स्वच्छ ठेवूया, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांनी येथे केले.कोल्हापूर शहरातील हवा प्रदूषण नियंत्रण आणि जनजागृतीसाठी महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, शिवाजी विद्यापीठातीलपर्यावरणशास्त्र विभाग यांच्यातर्फे आयोजित ह्यराष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाह्णअंतर्गत ऑनलाईन कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पर्यावरणतज्ज्ञ डॉ. पी. डी. राऊत यांनी कोल्हापुरातील हवा प्रदूषण आणि सद्य:स्थितीची माहिती दिली.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी हवा प्रदूषणविषयक कायदेशीर बाबींची माहिती दिली. पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांनी शहराच्या हवा प्रदूषण नियंत्रण आराखड्याबाबतची माहिती दिली. या आराखड्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करता येईल, याबाबत पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. पर्यावरण विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव यांनी स्वागत केले. त्यांनी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनातील विद्यापीठाची भूमिका स्पष्ट केली. क्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्राजक्ता सरकाळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पल्लवी भोसले यांनी आभार मानले.हवा प्रदूषणाबाबत जनजागृतीदेशातील १०२ शहरांपैकी एक किंवा महाराष्ट्रातील १७ प्रदूषित शहरांपैकी एक असे मानांकन कोल्हापूर शहराला मिळणे म्हणजे अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे या दृष्टीने जनमानसात हवा प्रदूषणाबाबत जनजागृतीसाठी पर्यावरणशास्त्र विभाग, महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाऊल टाकले आहे.कृती आराखड्याचा भागराष्ट्रीय हरित लवादाने कोल्हापूरसाठी प्रत्येकी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत उपाययोजना म्हणून हवा प्रदूषण कृती आराखडा राबविण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. कृती आराखड्याचा एक भाग म्हणून सद्य:स्थितीमध्ये कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली.