कोल्हापूर : पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या दबावापोटीच जिल्हा उपनिबंधकांनी अशासकीय मंडळावर बेकायदेशीर कारवाई केल्याचा आरोप अशासकीय मंडळाचे माजी अध्यक्ष आर. के. पोवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. राजकारणात आम्हीही अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत, पण अशी सुडाने कारवाई करणे उचित नाही. प्रशासक रंजन लाखे यांच्या विरोधातील न्यायालयीन लढाई सुरूच राहील, असेही पोवार यांनी सांगितले. राज्य शासनाने राज्यातील सर्व अशासकीय मंडळ बरखास्तीचे आदेश दिले, हे आम्हाला मान्य आहे. पण कोल्हापूर बाजार समितीचा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने शासनआदेश या समितीला लागू होत नाही, असे आजही आमचे मत आहे पण जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी तातडीने आमच्यावर कारवाई केली. आपल्या आजपर्यंतच्या राजकीय आयुष्यात न्यायप्रविष्ठ बाब असताना तहसीलदार, पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन पदभार स्वीकारण्यासाठी कोणी आलेले आठवत नाही. सोमवारी सायंकाळी घडलेला प्रकार निंदनीय असून यामागे कोण आहे, याची आम्हाला पूर्णपणे माहिती आहे. आम्ही ही राजकारणात अनेक वर्षे काम करत आहे, अनेक चळवळीत आम्हीही सक्रिय आहे, पण असे घाणेरडे राजकारण कधी केले नाही. राजकीय सूडबुद्धीतून समाजात प्रतिष्ठा असणाऱ्या सदस्यांवर पदभार सोडण्यासाठी दबाव आणण्याचे काम मंत्रिमहोदयांनी केल्याचा गंभीर आरोप आर. के. पोवार यांनी केला. गेले तीन महिन्यांत शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय घेऊ शकलो याबद्दल आम्हाला समाधान आहे. गुळाच्या नियमन रद्दमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या सोडवून गुळाचे सौदे नियमित करण्यात आम्हाला यश आले, असे अनेक महत्त्वाकांक्षी व समितीच्या उन्नतीच्या दृष्टीने निर्णय घेऊन अशासकीय मंडळाने आदर्श कामाचा पायंडा समितीत पाडला आहे. रंजन लाखे यांनी रितसर पदभार घेतला असेल, पण न्यायप्रविष्ठ बाब आहे. यासंबंधी ८ डिसेंबरला न्यायालयात सुनावणी आहे. त्यावेळी काय निर्णय होतो, हे पाहिले जाणार असून प्रशासकांविरोधातील कायदेशीर लढाई मात्र सुरूच ठेवणार असल्याचे पोवार यांनी सांगितले.
पणनमंत्र्यांच्या दबावापोटीच कारवाई : आर. के.
By admin | Published: November 18, 2014 11:54 PM