कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सचे पालन न करणे आदींबाबत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश असून कोल्हापूर शहरात त्याची अंमलबजावणी आज, बुधवारपासून होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींकडून एक कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
कोल्हापूर शहरात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या वाढत्या रुग्णांची संख्या विचारात घेता कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून घ्यावयाच्या काळजीच्या अनुषंगाने मास्क न वापरणाऱ्य व्यक्ती तसेच दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट, मंगल कार्यालय, भाजी मार्केट याठिकाणी मास्क न वापरणे, वाहन चालविताना चेहऱ्यावर अर्धवट मास्क लावणे व गर्दी करून सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
शहरातील नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा तसेच दुकाने आस्थापना, हॉटेल्स, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी मास्क व सोशन डिस्टन्सचे पालन करून कोरोनाची दुसरी लाट येऊ नये याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासक बलकवडे यांनी केले आहे.