उत्तूर : कन्या वाचवण्यासाठी केवळ संकल्प न करता त्याची कृती हवी, योगदान महत्त्वाचे आहे, तरच कन्या वाचवल्या जातील, असे प्रतिपादन उत्तूर (ता. आजरा) येथील त्रिवेणी सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आयोजित संत ज्ञानेश्वर लोकशिक्षण व्याख्यानमालेत ‘संकल्प करू मोलाचा : कन्यारत्न वाचवण्याचा’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना देविदास इंगळे (पुणे) यांनी केले.संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे यांच्या हस्ते करून व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला. इंगळे म्हणाले, संकल्प हा व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपाचा असतो. स्वच्छता ही आपल्या उंबऱ्यापर्यंत न करता बाहेरची स्वच्छता ठेवणेही गरज आहे. प्रत्येकाने कन्या वाचवली पाहिजे, नाही तर जीवनच अंधकारमय बनेल. मुलगा हवा या हव्यासापोटी कन्या रोखली जाते, हे दुर्दैव आहे. गर्भपात करून घेऊ नये, यासाठी महिलांनी खंबीर उभे राहिले पाहिजे. शासन कायदे करते; पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही. कन्या वाचवणे ही जबाबदारी प्रत्येक स्त्री-पुरुषाची आहे. केवळ संकल्प करून उपयोग नाही, तर ती सत्यात उतरली पाहिजे.यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश आपटे, माजी सभापती वसंतराव धुरे, सरपंच सुप्रिया पाटील, पं. स. सदस्या निर्मला व्हनबट्टे, उपसरपंच संजय उत्तूरकर, देशभूषण देशमाने, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.त्रिवेणीचे अध्यक्ष टी. के. पाटील यांनी स्वागत केले. अतिथी परिचय सदानंद पुंडपळ यांनी करून दिला. सुहास पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. महेश करंबळी यांनी आभार मानले. (वार्ताहर)
कन्या वाचवण्यासाठी कृती हवी
By admin | Published: January 02, 2015 10:27 PM