कोल्हापूर : आक्षेपार्ह मजकुराबाबत आदेश देऊनही मे. फडके प्रकाशनने पूर्णत: पुस्तके मागे घेतलेली नाहीत. पुस्तकांवरील विद्यापीठाचे नाव तसेच ठेवले आहे, ही बाब गंभीर असल्याने त्याबाबत संबंधितांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र शिवाजी विद्यापीठ प्र. कुलगुरुंनी मंगळवारी रात्री राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिले.बी.ए.३ सेमीस्टर ५, इतिहास व इतर दोन विषयांच्या मे. फडके प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर छपाई केल्याचे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष रुपेश पाटील यांनी उघडकीस आणले. मे. फडके प्रकाशनाने शिवाजी विद्यापीठाच्या नावाचा उल्लेख करण्यासाठी पूर्वपरवानगी घेतली नाही, विद्यापीठानेही त्यांना नाव वापरण्याबाबत परवानगी दिलेली नाही. त्यामुळे विद्यापीठाने या पुस्तकांवर बंदी घातली.
फडके प्रकाशनाला तत्काळ पुस्तकांची विक्री थांबविण्याचे आदेश दिले, तरीही मे. फडके प्रकाशन यांनी त्या शब्दांची सुधारणा केली असल्याचे कळविले. त्यांनी पुस्तके पूर्णत: मागे घेतली नाही, विद्यापीठाचे नावही पुस्तकावर तसेच ठेवले. ही बाब गंभीर असल्याने संबंधितांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, असे पोलीस ठाण्यात दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.