बांबवडे : पिशवी (ता. शाहूवाडी) येथील शासकीय गायरान जमिनीत अवैधरित्या अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे झाड फाऊंडेशन व हरित सेना यांच्यातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पिशवी येथे गायरानामध्ये निसर्गाचा अमूल्य ठेवा जपण्यासाठी ऑक्सिजन पार्क, अटल आनंदवन योजना, वसुंधरा अभियान यशस्वीपणे राबवले जात आहे. परंतु, काही समाजकंटकांकडून वारंवार या जागेची नासधूस केली जात आहे. तसेच या जागेत अवैधरित्या उत्खननही केले जाते.
आता या जमिनीवर कायमस्वरूपी कब्जा करण्यासाठी टेकडीचे उत्खनन करून दुर्मीळ वृक्ष, वनस्पती तोडून घर बांधले आहे. हे पाहून आणखी काही समाजकंटक येथे घरे बांधण्याची तयारी करत आहेत. या सर्व प्रकाराची माहिती स्थानिक प्रशासन, तालुका प्रशासन व जिल्हा प्रशासनापर्यंत वारंवार कळविण्यात आली आहे. परंतु, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली जात नाही.
त्यामुळे या गावचा अमूल्य नैसर्गिक ठेवा जपण्यासाठी अशा समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे झाड फाऊंडेशन व हरित सेना यांच्यातर्फे करण्यात आली आहे.
१६ पिशवी अतिक्रमण
फोटो पिशवी येथे गायरानामध्ये अतिक्रमण करून घर बांधले आहे.