कोल्हापूर : महानगरपालिकेच्या बापट कॅम्प येथील कत्तलखान्याकडील अधिकारी व कर्मचारी जनावरांची वैद्यकीय तपासणी न करताच खोटे शिक्के मारत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने गुरुवारी जयराज कोळी यांनी पत्रकार परिषदेत केली.
प्रहार जनशक्तीच्यावतीने २३ डिसेंबर २०२० रोजी बापट कॅम्प कत्तलखान्याबाबत अन्न व औषध विभागाकडे तक्रार करण्यात आली होती, त्यावेळी काही त्रुटी आढळून आल्या होत्या. हलगर्जीपणाबद्दल पालिकेला नोटीसही देण्यात आली होती. परंतु तेथील गोंधळजनक कारभार काही संपलेला नाही. आजही जनावरांची तपासणी केली जात नाही. बोगस शिक्के मारले जात आहेत. सध्या कोरोनाची साथ सुरू आहे. तरीही कर्मचारी, अधिकारी पुरेशी खबरदारी घेत नाहीत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. तरी संबंधित अधिकाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी पक्षातर्फे करण्यात आली.
यावेळी दगडू माने, समीर यवलुजे उपस्थित होते.