कोल्हापूर : नगररचना विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी मोजक्या लोकप्रतिनिधी आणि काही बांधकाम व्यावसायिक यांच्याशी संगनमत करून ओढ्या, नाल्यांचे मार्ग बदलण्यास आणि त्यामध्ये भराव टाकून बांधकामे करण्यास परवानगी दिली आहे. म्हणूनच अशा अधिकाऱ्यांवरच प्रथम कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी गुरुवार प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली आहे.
कोणत्याही प्रकारचे विनापरवाना व बेकायदेशीर बांधकामांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी प्रामुख्याने नगररचना विभागावर असूनही गेल्या दहा वर्षात अशा प्रकारची परवानगी मोठ्या प्रमाणात दिली आहे. अधिकाऱ्यांसह ज्या बांधकाम व्यावसायिकांनी ओढे-नाले वळवले किंवा त्यात भराव टाकून अतिक्रमण केले अशा व्यावसायिकांवरही कारवाई होणे गरजेचे आहे, असे ठाणेकर यांनी म्हटले आहे.
ज्यांनी अतिक्रमण केले त्यांना सोडून सामान्य नागरिकांना त्रास दिला जाण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे कोणाही सामान्य व्यक्तीस विनाकारण त्रास दिला गेल्यास, बांधकाम व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणांसाठी त्या बांधकाम व्यावसायिकाऐवजी त्याचा वापर करणाऱ्या सामान्य फ्लॅटधारकास त्रास दिला गेल्यास भारतीय जनता पार्टी याविरुद्ध तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी निवेदनात दिले आहे.