कोल्हापूर : युरिया खतविक्रीमध्ये गैरप्रकार करणाऱ्या जिल्ह्यताील ४० कृषिसेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील ३० केंद्रांवरून खतविक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे; तर १० सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचे प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २० लाख रुपयांच्या खतविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.या वर्षी जिल्ह्यात युरियाची मागणी वाढली असताना दुसरीकडे मोठी टंचाई निर्माण झाली होती. शेतीसाठी या खताला शेतकऱ्यांकडून मोठी मागणी असते. शासनाने मंजूर केलेल्या कोट्यानुसार जिल्ह्यात युरियाचा पुरवठा करण्यात आला. तरीही अनेक शेतकऱ्यांना वेळेत युरिया खत मिळाले नाही. याबाबत मोठा असंतोष पसरला होता. अनेक छोट्या-छोट्या शेतकऱ्यांना युरिया खतच मिळाले नाही; तर अनेक धनदांडग्यांनी मात्र खताची लयलूट केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे जादा खत खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे क्षेत्र किती, त्यांनी खताचा किती वापर केला आहे, खताची साठवणूक केली आहे का, याची तपासणी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या.या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तपासणी मोहीम हाती घेतली होती. ज्या कृषिसेवा केंद्रांमधून विशिष्ट शेतकऱ्यांना सर्वाधिक युरिया खताचे वितरण करण्यात आले, अशा केंद्रांची तपासणी करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला.जिल्ह्यात १५९० कृषी केंद्रे असून त्यांपैकी ४६ कृषिसेवा केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचे या तपासणीत स्पष्ट झाले आहे. यांपैकी ३० केंद्रांमधून खतविक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे; तर १० कृषिकेंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे यापुढील काळात तरी खतविक्री करताना संबंधित दक्षता घेतील, अशी अपेक्षा आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि मोहीम अधिकारी सतीश देशमुख यांनी या मोहिमेचे नियोजन केले.
जिल्ह्यात गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. ६ डिसेंबरपर्यंत तपासणी आणि कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ६ डिसेंबरपर्यंत जे रासायनिक खत विक्रेते क्यू आर कोड काढणार नाहीत, त्यांचे परवाने रद्द करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.-चंद्रकांत सूर्यवंशीजिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर