इचलकरंजी : ब्रेक द चेनअंतर्गत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन केला आहे. असे असतानाही विनाकारण व मॉर्निंग वॉकसह फिरणाऱ्या ७७ जणांवर कारवाई करण्यात आली.
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्यासह नागरिकांना घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध घातले आहेत. असे असतानाही विविध भागात मॉर्निंग वॉकसाठी फिरणाऱ्यांची संख्या मोठी होती. अशा व्यक्तींवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. पहाटेपासूनच पोलिसांकडून ही मोहीम सुरू होती. इचलकरंजी-सांगली रस्त्यावर वडगाव बाजार समिती परिसरात अनेकांनी भाजीपाला विक्रीसाठी ठाण मांडले होते. त्यावेळी पोलिसांनी कारवाई केल्यामुळे विक्रेते, व्यापारी व नागरिकांची तारांबळ उडाली. काही विक्रेत्यांसह दुचाकीस्वारांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली.
शहरातील इतर भागातही अन्य आस्थापना सुरू होत्या. अशा १४ जणांवर शिवाजीनगर व गावभाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिवाजीनगर पोलिसांनी मॉर्निंग वॉकसह विनाकारण फिरणाऱ्या ३० जणांवर, शहापूर पोलिसांनी १५ जणांवर आणि गावभाग पोलिसांनी ३२ जणांवर कारवाई करून त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी त्यांचे प्रबोधन केले. तसेच विनाकारण फिरणाऱ्या २७ मोटारसायकलस्वारांवर शहर वाहतूक शाखेने, तर १५ जणांवर गावभाग पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. ही कारवाई अशीच चालू राहणार असून आज, सोमवारपासून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक महामुनी यांनी सांगितले.