कोल्हापूर : येथील कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या परीक्षा योजनेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील ना. म. जोशी विद्याभवन या शाळेने परीक्षा घेतली नाही. त्यामुळे गोपनीयतेचा भंग केला. त्यामुळे प्रश्नपत्रिका प्रसारमाध्यमातून प्रसारित झाल्या. त्यामुळे परीक्षा योजनेतून ही शाळा कमी करून संबंधित घटकांवर कारवाई करण्याचा निर्णय मुख्याध्यापक संघाने मंगळवारी घेतला. पुढील परीक्षांचे पेपर या शाळेला न देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
मुख्याध्यापक संघामार्फत शाळांना घटक चाचण्या, सहामाही, पूर्व आणि वार्षिक परीक्षांच्या प्रश्नपत्रिका मागणीप्रमाणे पुरविल्या जातात. याबाबत शाळास्तरावर गोपनीयता राखली जाते. शाळेने गोपनीयतेचा भंग केल्यास अशा शाळांवर शिस्तभंगाची कारवाई यापूर्वी केली आहे. प्रश्नपत्रिका या परीक्षेपूर्वी दिल्या जातात. कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, पुणे, नाशिक, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतील शाळा सहभागी असल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील यांनी दिली. संघाच्या बैठकीस उपाध्यक्ष बी. आर. बुगडे, मिलिंद पांगिरेकर, सहसचिव अजित रणदिवे, श्रीकांत पाटील, जितेंद्र म्हैशाळे, सागर चुडाप्पा, श्रीशैल्य मठपती, आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
प्रश्नपत्रिका प्रसारमाध्यमातून प्रसारित झाल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेकडे संघाने तक्रार दाखल केली आहे. त्या तपासातून माहिती समोर आली. त्यामुळे शाळा आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.- दत्ता पाटील, सचिव, मुख्याध्यापक संघ