कोल्हापूर : इलेक्ट्रॉनिक वजनकाटा वापरणाºया प्राथमिक दूध संस्थांवर कारवाई करण्यास वैधमापन शास्त्र विभागाने सुरू केले आहे. कायद्याचे पालन न करणाºया वैधमापन शास्त्र विभागाला संभाजी ब्रिगेडने मंगळवारी जाब विचारल्यानंतर त्यांनी कारवाई सुरू केली असून, पहिल्याच दिवशी करवीर तालुक्यातील एका दूध संस्थेवर कारवाई केली आहे.
प्राथमिक दूध संस्थांनी संकलन पारंपरिक लिटर मापाने करणे कायद्याने बंधनकारक आहे; पण गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याच्या माध्यमातून संकलन केले जाते. यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने दूध उत्पादक शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. याविरोधात संभाजी ब्रिगेडने आंदोलन करून कायद्याचे पालन करण्याची मागणी केली होती.
त्यांनी वैधमापन शास्त्र विभाग, सहायक निबंधक (दुग्ध), विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांच्याकडे तक्रार करून संस्थांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार निबंधक कार्यालयाने संस्थांना पत्रे पाठवून लिटर मापाने दूध संकलन करण्याचे आदेश दिले होते तरीही संस्थांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यानेच संकलन सुरू असल्याने मंगळवारी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी वैधमापन शास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक नरेंद्रसिंह यांचा गांधीगिरी मार्गाने सत्कार केला. यावेळी त्यांनी जाब विचारण्यास सुरुवात केल्याने गोंधळ उडाला.
त्यामध्ये लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी मध्यस्थी करत कायद्याचे पालन करण्याचे सूचना नरेंद्रसिंह यांना दिली. त्यानंतर दूध संस्थांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. यावेळी विनायक पाटील, हणमंत पाटील, नेताजी बुवा, वैभव मोरे, नीलेश सुतार, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.