कोल्हापूर : काविळीला रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘अल्बुमिन’ औषधाची छापील (एमआरपी) किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ अन्वये कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहायक आयुक्त (औषध) अर्जुन फडतरे यांनी दिली़ राज्यभरात अल्बुमिनचा तुटवडा निर्माण असल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते़ या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधला असता, ही माहिती मिळाली़ फडतरे म्हणाले, अल्बुमिनची निर्मिती मुंबई येथील रिलायन्स लाईफ लॅब येथे केली जाते़ अल्बुमिनच्या विक्रीसाठी कोल्हापुरात एकच घाऊक विक्रेता आहे़ १०० मिलीच्या एका बाटलीची छापील (एमआरपी) किंमत ४०५३ आहे, तर ५० मिलीच्या बाटलीची किंमत २०२७ इतकी आहे़ सध्या शहरातील घाऊक विक्रेत्यांकडे सहा बॉटल्स अल्बुमिन उपलब्ध आहे. अल्बुमिनची निर्मिती मानवाच्या रक्तातील घटकापासून केली जाते. रासायनिक प्रक्रियेतून अल्बुमिनची निर्मिती होत नाही़ औषध परवाना असलेली मेडिकल्स व हॉस्पिटल्स अल्बुमिनची विक्री करू शकतात़ अल्बुमिनची निर्मिती करणाऱ्या कंपन्या रक्तपेढ्यांतून संकलित केलेल्या रक्तापैकी अतिरिक्त रक्ताची खरेदी करतात़ या रक्तातून ‘अल्बुमिन’ची निर्मिती करतात़ हा घटक देशभरातून मागवता येऊ शकतो़ त्याच्या किमतीवर औषध प्रशासनाचे नियंत्रण असते, अशी माहिती त्यांनी दिली़ (प्रतिनिधी)
‘अल्बुमिन’ची एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास कारवाई : फडतरे
By admin | Published: June 19, 2015 12:45 AM