शिरोळ : औरवाड (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू चोरी करुन साठा केल्याप्रकरणी शिरोळच्या तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी कारवाईचा बडगा उगारला. वाळू वाहतुक करणारे पाच ट्रक आणि एक ट्रॅक्टर तसेच चोरलेली ६० ब्रास वाळू असा एकूण १५ ते २० लाखापर्यंतचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तहसीलदार मोरे यांच्या कारवाईमुळे वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरासमोरील कृष्णा नदी पात्रातून औरवाड येथून बेकायदेशीर वाळू चोरीचे प्रकार मध्यरात्री होत असल्याने याबाबतची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मोरे यांनी पथक तयार करुन शनिवारी मध्यरात्री पोलिस बंदोबस्तात कारवाईचा बडगा उगारला. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी दिवसभर ही कारवाई सुरू होती.
कारवाईत नायब तहसीलदार संजय काटकर, पी. जी. पाटील, मंडल अधिकारी बबन पाटील, अनिल पाटील, यांच्यासह कर्मचा-यांनी सहभाग घेतला.