कोल्हापूर : स्वच्छ व सुंदर कोल्हापूर शहर करण्यासाठी महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत; त्यासाठी शहरातील उद्याने, पंचगंगा घाट, फूटपाथ स्वच्छ ठेवण्यात येत आहेत; परंतु काही हुल्लडबाज तरुण रात्री उद्यान परिसरात रस्सा पार्टी करून घाण करतात. त्यांना विरोध करणाऱ्या सुरक्षारक्षकांना धमकाविणे, मारहाण करणे, असे प्रकार घडत आहेत. उद्यान परिसरात रस्सा पार्टी करणाऱ्यांवर कठोर कारवाई यापुढे केली जाईल. परिसरात रात्रगस्त घालण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.उद्यान परिसरात जेवणावळी करून बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, सिगारेटची पाकिटे, माचीस, पत्रावळ्या, बाटल्या अस्ताव्यस्त टाकून परिसर घाण करून टाकतात.
सकाळी, सायंकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याने महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांनी बागेत गस्त घालावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार उद्यान परिसरात गस्त घालून पार्ट्या करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.