कोल्हापूर : गर्दीच्या ठिकाणी स्पोर्ट बाईकवरून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनधारकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिवसभरात धूम स्टाईलने फिरणाऱ्या १९ दुचाकीस्वारांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.अपघात टाळण्यासाठी मोहीम सुरू केल्याचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी सांगितले.स्पोर्ट बाईकवरून बेदरकारपणे सुसाट जाणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. अशा प्रकारचे अपघात टाळले जावेत, तरुणांचे प्रबोधन करण्यासाठी तसेच त्यांच्यावर कारवाईचा धाक रहावा यासाठी शहर वाहतूक शाखेने अशा वाहनधारकांना पकडून त्यांना सूचना केल्या जात आहेत. यातून अल्पवयीन वाहनधारकही सापडत आहेत.
शहर वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी शहर व उपनगरात विविध ठिकाणी नाकाबंदी करून १९ वाहने ताब्यात घेतली. वाहन चालविण्याचा परवाना नसणे, वाहनाची कागदपत्रे नसणे, ध्वनी आणि वायू प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन, वेगमर्यादेचे उल्लंघन याबाबत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. काही मुलांच्या पालकांना बोलावून त्यांनाही समजावून सांगण्यात आले. महाविद्यालयाच्या परिसरात अशी कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक बाबर यांनी सांगितले.