कोल्हापूर : जिल्ह्यात आज, रविवारी रात्रीपासून संचारबंदीचे नियोजन केले आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील प्रमुख चौक, नाक्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत ही गस्त वाढवण्यात येणार आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जिल्ह्यात रात्रीच्या संचारबंदीमध्ये आवश्यक पोलीेस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. आवश्यकता वाटल्यास राखीव पोलीस दलाचीही मदत घेणार आहे, रात्रीची संचारबंदी कडक करण्यात येत आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही रस्त्यावर फिरु नये असे आवाहन अधीक्षक बलकवडे यांनी केले. या बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी पोलीस अधिकार्यांची बैठक घेऊन संचारबंदीबाबत विशेष सुचना दिल्या.
होळी, रंगपंचमीत हुल्लडबाजांवर कारवाई
होळी व रंगपंचमी सणाच्या निमित्ताने महिलांची छेडछाड, ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह, ओपन बार, दुचाकीवरून हुल्लडबाजी असे गैरकृत्य करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार्यावर कडक कारवाई करणार. यासाठी स्वतंत्र पथके तैनात केली असून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल असे कृत्य करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असे अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. सणाच्या पार्श्वभूमीवर मद्याची तस्करी, ओपन बार, गावठी दारूची वाहतूक, साठवणूक, विक्री याची शक्यता ओळखून साध्या वेशातील पोलीस पथके शहरासह ग्रामीण भागात फिरून कारवाया करणार आहेत. कोल्हापूरसह इचलकरंजी शहर, कुरुंदवाड, कागल, शिरोळ, हातकणंगले या गावांवर भरारी पथकाचे विशेष लक्ष राहणार आहे. राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल यांचीही मदत घेतली जाणार आहे.
सराईतांना पकडण्यासाठी स्वतंत्र पथके
सणाच्या निमित्याने सराईत गुन्हेगार बाहेर पडतात. गुन्हा करून पळून जातात. हे ओळखून गेल्या काही वर्षांत ठिकाणी घटना घडल्या, तेथे बंदोबस्त वाढवला जाणार आहे, सराईतांना पकडण्यासाठी स्वतंत्र पथके नेमली जाणार आहेत.