इचलकरंजी : अवैध व्यावसायिकांशी लागेबांधे व नागरिकांशी उद्धट वर्तन असा ठपका ठेवून शहापूर पोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. या कारवाईचे शहरवासीयांतून स्वागत होत असतानाच शहरातील काही अधिकारीही याला जबाबदार असल्याने त्यांची बदली कधी ? असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिस अधीक्षक महादेव तांबडे अशा प्रकरणाच्या मुळाशी जाणार का ? तसेच इचलकरंजी पोलिस दलाची दिवसेंदिवस मलिन होत चाललेली प्रतिमा सुधारणार काय? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.शहरातील वाढती गुन्हेगारी, दिवसाढवळ्या घडणारे थरारक प्रकार, अवैध व्यावसायिकांचे पसरलेले जाळे, आॅनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला मटका, त्यामध्ये दिवसभर गुरफटून पडणारी तरुण पिढी, चोऱ्यांचे वाढलेले प्रमाण, बसस्थानक, आठवडी बाजार याठिकाणी होणाऱ्या चोऱ्या असे गुन्हेगारी क्षेत्रातील दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रमाण यामुळे शहरातील पोलिस दल नेहमी चर्चेत असते. त्यातच अनेक पोलिस गुन्हेगार व अवैध व्यावसायिक यांच्याशी संबंध ठेवून माया गोळा करताना दिसतात. त्यांच्यावर पडद्यामागून एखाद्या अधिकाऱ्याचा हात असतो, हे जगजाहीर आहे.अधिकाऱ्याचा खास असल्याने दररोजच्या ड्युटी रजिस्टरमध्ये अशा माया गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूकही खास असते. त्यामुळे त्यांना इतर कामे करावी लागत नाहीत. शहापूर पोलिस ठाण्यातील गजानन सिद, एस. डी. गिरी, महादेव बिरंजे व अभिजित भातमारे या चौघांची तडकाफडकी बदली करण्यात आली; पण अन्य पोलिस ठाण्यांमध्येही असे ‘खास’ पोलिस कामगिरी बजावत आहेत. त्यांच्याविरोधात तक्रार नाही, म्हणजे ते नामानिराळेच का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तर या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांचाही अशा प्रकारांमध्ये सहभाग असतो, हे सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. पोलिस अधीक्षक तांबडे यांनी शहर पोलिस दलातील अशा घडामोडींच्या मुळाशी जाऊन तशा अधिकाऱ्यांना वेळीच वेसन घालावे. तसेच पोलिस दलाची मलिन होत चाललेली प्रतिमा सुधारण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावीपूर्वीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या धडाकेबाज कामगिरीतून मोडीत काढलेली गुन्हेगारी व उद्ध्वस्त केलेले अवैध व्यावसायिकांचे जाळे आपल्या विशेष प्रयत्नातून पुन्हा जोमाने कार्यान्वित करणाऱ्या शहरातील एका प्रमुख अधिकाऱ्याची बदली होणार असल्याची चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून पोलिस वर्तुळासह शहरवासीयांत सुरू आहे. यालाही मूर्त स्वरूप देत त्याठिकाणी पोलिस अधीक्षक तांबडे यांनी एका सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशीही मागणी होत आहे.
कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली; अधिकाऱ्यांवर कधी ?
By admin | Published: April 13, 2017 12:26 AM