मलकापूर प्रतिनिधी : शाहूवाडी तालुक्यात सभापती विजय खोत व गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांनी सलग दुसऱ्यादिवशी तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या असता, अनधिकृतपणे तेरा शिक्षक गैरहजर आढळून आले, तर तीन शाळा कुलूपबंद असल्याचे निदर्शनास आले. संबंधित शाळेतील विनापरवाना गैरहजर शिक्षकांवर कारवाई केली जाणार असल्याचे सभापती विजय खोत यांनी सांगितले .
सभापती विजय खोत व प्रभारी गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांनी संयुक्तरित्या शाहूवाडी तालुक्यात शाळा तपासणी मोहीम सुरू केली आहे. याच अनुषंगाने बुधवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी केलेल्या शाळा तपासणीत सहा शाळा या अनधिकृतपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या; तर संबंधित शाळेतील शिक्षकही अनधिकृतपणे गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले होते. याची गंभीर दखल घेऊन त्यांची एक दिवसाची बिनपगारी रजा करण्याबरोबर त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सभापती यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे.
विद्यामंदिर, बुरंबाळ, कुंभवडे, नवलाईदेवीवाडी, पारी वने, गेळवडे बौद्धवाडी, गेळवडे, मालाई वाडा, धनगर वाडा, पांढरेपाणी, मौसम या १० शाळेतील तेरा शिक्षक गैरहजर होते, तर शेंबवणे, धुमकवाडी व कुभ्यांचीवाडी या तीन शाळांना कुलूप लावण्यात आले होते.