कोल्हापूर : घरफाळा विभागातील घोटाळ्याप्रकरणी दोषी असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शंभर टक्के कारवाई होणार आहे. कोणालाही यातून सोडले जाणार नाही, असा इशारा महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
बलकवडे यांनी सांगितले की, घरफाळ्यातील घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. चौकशी समितीने आपला अहवाल दिला आहे. सध्या मुख्य लेखा परीक्षकांकडे हा अहवाल छाननीकरिता दिला आहे. त्यांच्याकडून २० जुलैपर्यंत अहवाल मला मिळेल. एक- दोन दिवस वेळ झाला तरी चालेल; पण योग्य अभिप्रायासह अहवाल द्या, असे मुख्य लेखा परीक्षकांना सांगितले आहे. त्यामुळे कारवाई होणार, यात कोणी शंकाच घेऊ नये. जी कारवाई यापूर्वी झाली, तशीच पुढील कारवाईसुद्धा असेल.
घरफाळा विभागाची सर्व माहिती समोर आणली जाईल, कोणाला वाचविण्याचा आपला प्रयत्न राहणार नाही, असे स्पष्ट करतानाच बलकवडे यांनी आपण या विभागाचे शासनाच्या लेखा निधी विभागाकडील विशेष पथकाकडून लेखापरीक्षण करून घेत असल्याचे सांगितले.
‘सावित्रीबाई’मध्ये आता रात्रीही प्रसूती होणार -
सावित्रीबाई फुले सृतिकागृहात रात्रीच्या वेळीही प्रसूती विभाग सुरू करण्यात आला आहे. जुलै महिन्यात १७ सिझेरियन झाले. त्याकरिता तीन स्त्रीरोगतज्ज्ञ, तीन बालरोगतज्ज्ञ, दोन भूलतज्ज्ञ, अशा आठ डॉक्टरांचे पॅनल करण्यात आले आहे. कोविडमुळे सीपीआर रुग्णालयातील विभाग बंद असल्यामुळे तात्पुरती ही सोय करण्यात आली आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, डॉ. प्रकाश पावरा उपस्थित होते.