कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत गुन्हेगारांचा उपद्रव होऊ नये, यासाठी पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवायांना सुरुवात झाली आहे. गेल्या निवडणुकीतील गुन्हेगारांची यादी तयार असून, यात काही नवीन गुन्हेगारांची भर पडली आहे. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया करून अवैध धंदे आणि शस्त्र तस्करी रोखण्याचे आदेश पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.निवडणुकांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच तयारी सुरू होते. दारूची तस्करी, अवैध विक्री, शस्त्रांची तस्करी, वाढती गुंडगिरी यासह अवैध धंद्यांमुळे निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी पोलिसांकडून पूर्वतयारी सुरू झाली आहे. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी ३७८० संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या होत्या, तर विधानसभा निवडणूक काळात ३१११ जणांवर कारवाई झाली होती. आता जिल्ह्यातील नवीन गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे.मारामारी, अपहरण, धमकावणे, अमली पदार्थ, शस्त्र आणि मद्य तस्करी, गुंडांच्या टोळ्यांमधील सराईत गुन्हेगार, शासकीय कामात अडथळा आणून दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेले संशयित, यासह निवडणूक काळात गैरप्रकार केलेल्या सुमारे चार हजार संशयितांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. या सर्व संशयितांना नोटिसा पाठवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. सर्व पोलिस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि जिल्हा विशेष शाखेकडून यावर काम सुरू आहे.
अवैध धंद्यांवर होणार कारवायामटका, जुगार अड्ड्यांसह अवैध दारू विक्री करणाऱ्या संशयितांवर कारवाया करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहेत. यानुसार सर्व पोलिस ठाण्यांकडून अवैध धंद्यांवर कारवाया सुरू असून, याच्याशी संबंधित असलेल्या संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत.
लवकरच बॉर्डर मिटिंग होणारआचारसंहिता जाहीर झाल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक आणि उत्तर कर्नाटकातील बेळगाव ते विजापूरपर्यंतच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बॉर्डर मिटिंग होईल. त्या बैठकीत सीमा भागातील तपासणी नाके, फरार गुन्हेगारांवरील कारवाया, दारू आणि शस्त्र तस्करी रोखण्याबद्दल उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती अधीक्षक पंडित यांनी दिली.