कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या विंनती थांब्यांवर प्रवासी असूनसुद्धा गाडी थांबविली जात नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास होत होता. याबाबत ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने लोकमत हेल्पलाईनकडे सोमवारी तक्रार केली होती. याबाबतचे वृत्त मंगळवारी प्रसिद्ध होताच, विभाग नियंत्रकांनी त्यांची तत्काळ दखल घेत, जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये विनंती थांब्यांवर गाडी थांबविण्याबाबत पत्र पाठविले आहे. तसेच याबाबत पुन्हा तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.कोल्हापुरातून सांगली, मिरज या मार्गांवर धावणाऱ्या एस. टी. बसेस या मार्गावरील काही गावांतील प्रवाशांकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. विनंती थांब्यांवर प्रवासी असूनसुद्धा थांबत नाहीत; तर प्रवाशांनी थांब्यांवर गाडी थांबविण्याची विनंती करूनसुद्धा गाडी थांबविली जात नव्हती.
त्याचा फटका विशेषत: महाविद्यालयीन तरुण-तरुणींसह वयोवृद्ध व महिला प्रवाशांना बसत होता. याबाबत महामंडळाकडे वारंवार तक्रार करूनसुद्धा कोणीच दखल घेत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांनी लोकमत हेल्पलाईनकडे याबाबत तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन मंगळवारी सर्व आगारांना विभाग नियंत्रकांनी पत्र पाठविले आहे.
विनावाहक व नॉन स्टॉप गाडी सोडून जे चालक व वाहक विनंती बस थांब्यांवर गाडी थांबविणार नाहीत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र जिल्ह्यातील सर्व आगारांना पाठविले आहे.- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक