कोल्हापूर : शहरातील ओढे, नाले यांच्या पात्रात अतिक्रमण करुन बांधलेल्या बांधकामांवर लवकरच कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
शहरात लहान मोठे प्रमुख बारा नाले आहेत. या नाल्यांच्या पात्रात अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. ही बाब नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीवेळी तसेच महापुरावेळी निदर्शनास आली. त्यामुळे महापुराला ही अतिक्रमणे जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले. कोल्हापूर दौऱ्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा बांधकामाच्या बाबतीत कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा दिला होता.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर महापालिका प्रशासनाकडून शहरातून वाहणाऱ्या सर्वच नाल्यांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. नाल्याच्या उगमापासून ते जेथे मिळतो तेथेपर्यंत ओढा व नाल्यांच्या दोन्ही बाजूंनी किती अतिक्रमणे झाली आहेत, पात्र कोठे वळविण्यात आले आहे याची माहिती या सर्वेक्षणात घेतली जात आहे. शहर अभियंता यांच्या नेतृत्वाखालील सर्व उपशहर अभियंता तसेच नगररचना विभागातील अभियंते संयुक्तपणे सर्वेक्षण करत आहेत. त्यांचा अहवाल प्रशासकांकडे सादर केला जाणार आहे.
सध्या मार्किंग केले जात असून किती बांधकामे नाल्यात आहेत हे अहवाल आल्यानंतर कळेल. अहवाल येताच तो सर्वांच्या माहितीसाठी खुला केला जाईल. त्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.
-व्यापाऱ्यांनी नियम पाळावेत -
कोरोना काळातील निर्बंध कमी करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनास आहेत. शासनाच्या निकषानुसार जे निर्बंध लावले जातील ते व्यापाऱ्यांनी पाळले पाहिजेत. अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे, त्यामुळे जे काही निर्णय व नियम होतील ते व्यापाऱ्यांनी पाळावेत, असे आवाहन बलकवडे यांनी केले.
भोसलेंवर कारवाई होणारच -
अंतर्गत लेखापरीक्षक संजय भोसले यांनी बेकायदेशीरपणे बदली व बढती मिळविल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्याबाबत चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांना नोटीस लागू केली आहे. त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाईल, असे प्रशासक बलकवडे यांनी स्पष्ट केले.