राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत बियाणे, खते, कीटकनाशकांच्या १४५० दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १३९ ठिकाणी अप्रमाणितपणा आढळला आहे. त्यापैकी ५४ जण न्यायालयीन कारवाईसाठी पात्र झाले आहेत. ८५ दुकानदारांना सक्त ताकीद देण्यात आली असून ३६ प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली आहेत. त्यामुळे अप्रमाणित खते, बियाणे व कीटकनाशक विकाल तर खबरदार, आता थेट कारवाई होणार आहे.बियाणे, खते, कीटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत. विशेषत: बियाणांबाबत शेतकऱ्यांच्या प्रत्येक हंगामात तक्रारी असतात. शंभर टक्के उगवण झाली नाही, उगवण झाली मात्र परिपक्व झालेच नाही. अशा अनेक तक्रारी पहावयास मिळतात. यासाठी जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील शेती सेवा केंद्रांची पूर्व कल्पना न देता तपासणी केली जाते. जिल्ह्यात १ एप्रिल ते १० डिसेंबर २०२१ पर्यंत बियाण्यांचे ६८५, खतांचे ४६४ तर कीटकनाशकांचे ३०१ नमुने घेतले होते. एकूण उद्दिष्टाच्या सरासरी ९९ टक्के नमुने घेतले आहेत. त्यापैकी १३९ नमुने अप्रमाणित आढळले आहेत. त्यापैकी ५४ दुकानदारांवर न्यायालयीन कारवाई केली आहे.खतांमध्ये अप्रमाणित अधिकबियाण्यांपेक्षा खतांमध्ये अप्रमाणितपणाचे प्रमाण अधिक दिसत आहे. खतांमध्ये छपाई केलेल्या घटकांचे प्रमाण योग्य आहे का? याची तपासणी केली जाते. यामध्ये १०७ दुकानात या प्रमाणात तफावत आढळल्याचे कारवाईवरून दिसून येते.
तपशील | बियाणे | खते | कीटकनाशके | एकूण |
नमुने | ६८५ | ४६४ | ३०१ | १४५० |
अप्रमाणित | २५ | १०७ | ७ | १३९ |
न्यायालीन कारवाईस पात्र | १९ | २८ | ७ | ५४ |
सक्त ताकीद | ६ | ७९ | ० | ८५ |
न्यायालयात दाखल | १७ | ० | ० | १७ |
मागील प्रलंबित न्यायालयीन | ९ | ९ | १ | १९ |
पोलीस गुन्हा | ० | १ | ० | १ |
निकाली | १ | ० | ० | १ |
गेल्या आठ महिन्यांत खते, बियाणे, कीटकनाशकांच्या नमुने तपासणीत उद्दिष्टाच्या तुलनेत ९९ टक्के काम झाले आहे. दोषी आढळले आहेत, त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. - ज्ञानदेव वाकुरे (जिल्हा अधीक्षक,कृषी अधिकारी