बाळासाहेब खाडे यांचे बंधू बाजीराव खाडे यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. श्रीपतरावदादा बोंद्रे यांनी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली होती, पण ज्येष्ठ बंधू बाळासाहेब खाडे यांना हे तिकीट देऊन निवडणूक लढवावी, अशी चर्चा झाली. हाच त्यांच्या राजकारणातील प्रवेशाचा मैलाचा दगड ठरला. राजकारणापासून अलिप्त असले तरी बाळासाहेब खाडे काँग्रेसच्या विचाराने प्रभावित होते. या निवडणुकीत त्यांना अपयश आले पण याच दरम्यान ते काँग्रेसचे एकनिष्ठ नेते आमदार पी.एन. पाटील यांच्या संपर्कात आले आणि त्यांचे शिलेदार झाले. त्यांचा प्रत्येक आदेश व पक्ष जोडण्या लावण्याची जबाबदारी बाळासाहेब खाडे यांनी विश्वासाने केली. याचे फलित म्हणून त्यांना पुन्हा जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्यात आली, यात ते विजयी ठरले. सलग दोनवेळा जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर दरम्यानच्या काळात त्यांना शिक्षण सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षणाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांनी झपाटून काम केले. अबॅकस शिक्षण प्रणाली आपल्या काळात प्रभावीपणे राबवली. शिक्षणक्षेत्रात शिस्त लावण्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग राबवले.
स्थानिक पातळीवर काँग्रेसशी कार्यकर्त्यांची नाळ जोडण्यासाठी संपर्क आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे जाळे घट्ट केले. काँग्रेसच्या विचाराने प्रेरित होणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत केले आणि उत्तरोत्तर यात कट्टर काँग्रेस कार्यकर्त्यांची भर घालण्यात महत्त्वाचे काम केले. करवीर, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यात आमदार पी.एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसची घट्ट पकड निर्माण केली.
बाळासाहेब खाडे यांना कुंभी कासारी कारखान्यात संचालक पदाची संधी मिळाली. आमदार पी. एन. पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून करवीर विधानसभा मतदारसंघातील अनेक सहकारी संस्थातील कार्यकर्ते काँग्रेसशी जोडले. ऊस उत्पादकांच्या हितासाठी सत्ताधारी गटाच्या विरोधात आंदोलने केली. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बाळासाहेब खाडे नेहमी आक्रमक काम करत आले आहेत.
त्यांचा सहकारातील गाडा अभ्यास व अभ्यासू वृत्ती आणि दूध उत्पादकांसाठी असणारी तळमळ पाहून आमदार पी.एन. पाटील यांनी त्यांना गोकूळमध्ये मागील निवडणुकीत संधी दिली. या संधीचे सोने करून त्यांनी कोल्हापूर जिल्हा दूध संघासाठी मोठे योगदान दिले. याचमुळे त्यांना सत्ताधारी गटातून पी. एन. पाटील यांनी पुन्हा या निवडणुकीत संधी दिली. अनेक मातब्बर सहकारी बाजूला झाले असताना देखील पी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनलच्या प्रचाराची, राजकीय जोडण्याची जबाबदारी मोठ्या हिंमतीने राबवली. एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून बाळासाहेब खाडे यांना दूध उत्पादकांनी विश्वासाने निवडून दिले आहे.
विरोधक म्हणून ही मोठी संधी
बाळासाहेब खाडे हे सध्या विरोधी गटात बसणार आहेत. कुंभी कासारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत जशी अभ्यासू प्रश्नावली तयार करून सत्ताधारी गटाला खिंडीत पकडण्याची काम करतात तसेच ते यापुढेही गोकूळमध्ये विरोधी गटात राहून करतील, अशी अपेक्षा आहे.
...........
सांगरूळची पाणी योजना मार्गी
सांगरूळसाठी पेजल योजना राज्यात प्रथम राबवून एक रोल मॉडेल तयार केले. गावाला २४ तास शुद्ध व मुबलक पाणी मिळावे यासाठी सत्तेत असताना व्यक्तिगत लक्ष देऊन ही योजना सुरू केली. यामुळे गावाला २०१७चा लोकमत सरपंच अवॉर्ड बहाल करण्यात आला होता.
...............
प्रतिक्रिया
बाळासाहेब खाडे हे काँग्रेसचे एकनिष्ठ व निष्ठावंत कार्यकर्त्यातून तयार झालेले नेतृत्व आहे. आमदार पी.एन. पाटील यांच्या विचाराने प्रेरणा घेऊन त्यांनी वाटचाल सुरू ठेवली आहे. याचा परिणाम कोणत्याही सहकारी संस्थात शिस्त लावण्यासाठी आपल्या समोर अडचणी येणार असल्या तरी त्यांनी कधी तडजोड केलेली नाही. बाळासाहेब खाडे व बंधू बाजीराव खाडे यांनी करवीर विधानसभा मतदार संघात काँग्रेसला मजबूत करण्यासाठी मोठे काम केले आहे यामुळे त्यांना गोकूळच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. यापुढेही त्यांच्याकडून दूध उत्पादकांच्या हिताची कामे होतील,यासाठी शुभेच्छा.
---- सुभाष पाटील यशवंत बँक संचालक
...........
बाळासाहेब खाडे यांनी आ. पी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक पातळीवरील सर्व सहकारी संस्थांतील पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले असून जनतेच्या हिताची समाजकारण व राजकारण करण्यासाठी आग्रह धरला जातो. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सहकारी संस्थेत निस्वार्थी व उत्तम कारभार करण्यासाठी बाळासाहेब खाडे यांचा आग्रह असतो याच जोरावर त्यांनी जनमानसात आपली अभ्यासू व आक्रमक छाप पाडली आहे. गोकूळमध्ये आता नवीन पर्वाची त्यांच्यासाठी संधी निर्माण झाली आहे या संधीचे सोने करून दूध उत्पादकांच्या हितासाठी त्यांच्याकडून काम व्हावे.
.... एकनाथ पाटील यशवंत बँक चेअरमन
...........
आमदार पी. एन. पाटील यांच्या विचाराने बाळासाहेब खाडे हे कुशल संघटक म्हणून पुढे आले. आपल्या कामातून आणि एकनिष्ठेने त्यांना दुसऱ्यांदा गोकूळला संचालक म्हणून संधी दिली आहे. धाकटे बंधू बाजीराव यांचे सूक्ष्म नियोजन पाठीशी असल्याने काँग्रेसच्या मजबुतीकरणाचे काम आणखी नेटाने होईल, हीच शुभेच्छा.
--- सुनील पाटील अध्यक्ष सनियंत्रण पन्हाळा तालुका काँग्रेस