कोल्हापूर : लोकशाही असली तरी घराणेशाहीचा वरचष्मा इतका आहे की, उमेदवारी देताना कार्यकर्त्यांना नेहमीच वा-यावर सोडले जाते. निदान डमी अर्ज भरताना तरी कार्यकर्त्यांचा विचार होईल, ही अपेक्षाही फोल ठरताना दिसत आहे. गुरुवारपर्यंत अर्ज भरलेल्या उमेदवारांच्या नामांकनावर नजर टाकली तर आई, पत्नी, मुलगा यांच्याच नावाने डमी अर्ज भरण्यात आल्याचे दिसते. एवढे कमी म्हणून की काय म्हणून एकेका उमेदवारांनी तर स्वत:चेच चार-चार अर्ज भरले आहेत. कार्यकर्त्यांवर नेत्यांचा विश्वास राहिला नाही की काय, अशी शंका आता या निमित्ताने उपस्थित होत आहे.
काही कारणास्तव छाननीत अर्ज बाद झाला तर गोंधळ नको यासाठी दक्षता म्हणून डमी अर्ज भरले जातात. आतापर्यंत ब-यापैकी नेत्यांच्या जवळील प्रमुख कार्यकर्त्यांचेच अर्ज डमी म्हणून भरले जात होते. यावेळची निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरताना दिसत आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यापेक्षा रक्ताचे वारसदारच डमी अर्जासाठी सर्वच उमेदवारांनी निवडल्याचे दिसत आहे.
राधानगरीतून के. पी. पाटील यांना मुलगा विकास पाटील यांचा डमी अर्ज आला आहे. कागलमधून संजय घाटगे यांचा डमी अर्ज सून सुयशा घाटगे, समरजितसिंह घाटगे यांचा अर्ज पत्नी नवोदिता घाटगे यांच्या नावाने, तर हसन मुश्रीफ यांचा डमी अर्ज मुलगा नवीद मुश्रीफ यांच्या नावाने भरला आहे. करवीरमधून पी. एन. पाटील यांना मुलगा राहुल पाटील यांचा डमी अर्ज आहे. चंद्रदीप नरके यांचा उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांचा डमी अर्ज त्यांची आई शैलाबाई नरके यांच्या नावाने भरून ठेवण्यात आला आहे. कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर यांनी पत्नी वैशाली यांच्या नावाने डमी अर्ज भरला आहे. इचलकरंजीतून सुरेश हाळवणकर यांनीही पत्नी भारती यांच्या नावाने डमी अर्ज भरला आहे. प्रकाश आवाडे यांनीही मुलगा राहुल यांचाच डमी अर्ज दिला आहे. शिरोळमधून उल्हास पाटील यांनीदेखील पत्नी उज्ज्वला यांच्या नावानेच डमी अर्ज भरला आहे.रक्ताच्या वारसदारांनाच डमी अर्जात स्थानपत्नी, मुलगा अशा रक्ताच्या वारसदारांनाच डमी अर्जात स्थान देण्याचे प्रमाण वाढले असताना उमेदवारांनीच स्वत:चेच चार-चार डमी अर्ज भरल्याचीही उदाहरणे आहेत.
त्यात पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात असलेले ऋतुराज पाटील, विनय कोरे, राहुल खंजिरे यांचा समावेश आहे. आपलेच दोन अर्ज भरलेल्यांमध्ये संग्राम कुपेकर, सत्यजित जाधव, अरुण डोंगळे या बड्या नेत्यांचाही समावेश आहे.