विश्वास पाटील ।कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने दोन दिवस कोल्हापुरात केलेल्या हल्लाबोल आंदोलनाने आत्मविश्वास गमावून बसलेले कार्यकर्ते ‘चार्ज’ झाल्याचे चित्र दिसले; परंतु नेत्यांच्या गटबाजीचे काय, असा प्रश्न मात्र कायम राहिला. पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांनीही त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे आमदार हसन मुश्रीफ-खासदार धनंजय महाडिक यांच्यातील वर्चस्वाचा वाद, राधानगरी-भुदरगडमधील मेहुण्या-पाहुण्यातली रस्सीखेच, माजी खासदार निवेदिता माने यांची अस्वस्थता या गोष्टी तशाच राहिल्या. चंदगड मतदारसंघात डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी ‘राष्ट्रवादीच पुन्हा....’म्हटल्याने तूर्ततरी हा मतदारसंघ पक्षाच्यादृष्टीने ‘सेफ’ झाला.राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून ‘राष्ट्रवादी’चे कार्यकर्ते सैरभैर झाले होते. त्यात जिल्हा परिषदेत सत्तेचा घास हातातून निसटला. महापालिकेत सत्ता आहे, परंतु त्याचा फारसा उपयोग पक्षाला होत नाही. कोल्हापूर बाजार समितीत सत्ता असली तरी ती पक्षापेक्षा संचालकांचेच जास्त भले करते. नाही म्हणायला जिल्हा बँकेच्या सत्तेचाच पक्षाला मोठा आधार आहे. सत्तेत आल्यापासून भाजपचा वारू जोरात सुटला होता. त्यामुळे किती वर्षे आपल्याला सत्तेपासून बाजूला राहावे लागणार, असे राष्ट्रवादीवाल्यांना वाटत होते; परंतु गेल्या काही दिवसांत सत्तारूढ भाजपबद्दल राज्यात व देशातही वातावरण बदलत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचेच प्रतिबिंब हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने झालेल्या सभांमधून उमटले. या सभांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नेत्यांनी यंत्रणा लावली असली तरी सभेतला माहौल नेत्यांचा उत्साह वाढविणारा होता. त्यातून कार्यकर्त्यांना काही प्रमाणात ऊर्जा मिळाली. आपण सक्रिय व संघटित झालो तर राजकीय चित्र बदलू शकते, असा किमान विश्वास निर्माण करण्याचे काम काही प्रमाणात का असेना या आंदोलनाने झाले.आता प्रश्न उरतो तो नेत्यांतील बेदिलीचा. त्याची शस्त्रक्रिया सोडाच साधे इंजेक्शनही पक्षाचे नेते अजित पवार यांच्यापासून कुणीच न दिल्याने संघटनात्मक पातळीवरील दुही कायम राहणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आता फक्त सात-आठ महिनेच उरले आहेत; परंतु पक्षाच्या उमेदवारीबाबतचा मोठा संभ्रम आहे. आमदार हसन मुश्रीफ यांनी पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात उघड बंड पुकारल्याने पक्ष पुन्हा त्यांनाच उमेदवारी देणार का, ती दिली तर मुश्रीफ त्यांच्यासाठी प्रचार करणार का आणि उमेदवार बदलायचा झाल्यास सक्षम पर्याय कोणता हे सारेच प्रश्न अनुत्तरित आहेत. लोकसभेतील उपस्थिती महत्त्वाची असल्याने खासदार महाडिक या आंदोलनात कुठेच दिसले नाहीत. ते दिल्लीत होते हे मान्य केले तरी त्यांना मानणारा दुसऱ्या फळीतीलच एकही कार्यकर्ता या आंदोलनाकडे फिरकला नाही. ज्या पक्षाच्या नेत्याचे नाव ‘पंतप्रधानपदाचे उमेदवार’ म्हणून पक्षही घेऊ लागला आहे, त्या पक्षाच्यावाट्याला येणाºया एका जागेवरही ही अनागोंदी आहे.पक्षाला किमान संधी आहे अशा जिल्ह्यामधील विधानसभेच्या किमान चार जागा आहेत. त्यातील कागल व चंदगडला पक्षीय गटबाजी नाही. गडहिंग्लजच्या तार्इंना मध्यंतरी भाजपचे वेध लागले होते. त्यामुळे पक्षाच्या अडचणी वाढल्या होत्या परंतु या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी त्याबाबतची स्पष्टता केल्यामुळे तेथील ‘पुढे काय’ हा गुंता सुटला. आता खरी कसोटी राधानगरी-भुदरगड मतदारसंघात आहे. तिथे के. पी. पाटील व ए. वाय. पाटीलही मागे हटायला तयार नाहीत. ‘आता नाही तर कधीच नाही’ असे ए. वाय. यांना वाटते. त्यामुळे पक्ष तिथे संधी कुणाला देतो आणि ज्यांना संधी मिळाली नाही ते पक्षाशी किती प्रामाणिक राहतात, हाच कळीचा मुद्दा आहे. शिरोळला राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी चांगली हवा केली आहे; परंतु दोन्ही काँग्रेसच्या वाटणीत हा मतदारसंघ खेचून घेणे हे पक्षापुढे आव्हान असेल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेससोबत आघाडी केली तर गुंता आणखी वाढणारआहे.माजी खासदार निवेदिता माने यांचा मुलाच्या राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू आहेत; परंतु त्याला बºयाच मर्यादा आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाने विचार करावा, असे त्यांना वाटते परंतु हा मतदारसंघ त्यांचा शेवटचा पराभव झाला तेव्हाच त्यांच्या हातातून निसटला आहे. धैर्यशील माने यांनी अगोदर आपल्याला लढायचे कुठे हे निश्चित करायला हवे. त्यादृष्टीने संघटनात्मक बांधणी करायला पाहिजे. निवडणुका तोंडावर आल्यावर नेत्यांना भेटून अशी संधी मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला स्वत:ची राजकीय ताकद दाखविता आली पाहिजे. ती ताकद बाळगून होते म्हणूनच दिवंगत बाळासाहेब माने यांनी जिल्ह्णाच्या राजकारणावर छाप पाडली. त्याचा अभ्यास केला तरी धैर्यशील यांची पुढील वाटचाल सुलभ होईल.‘कोल्हापूर उत्तर’च्या जागेवर दावा शक्यकोल्हापूर शहराला लागून असलेले तिन्ही मतदारसंघ आता काँग्रेसकडे आहेत. दोन्ही काँग्रेस एकत्र लढल्या तर ‘कोल्हापूर उत्तर’च्या जागेवर राष्ट्रवादी दावा करू शकतो. तिथे मधुरिमाराजे यांच्या उमेदवारीबाबत वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू आहेत. छत्रपती घराणे व पवार कुटुंबीय यांच्यातील संबंध पाहता अशा घडामोडी शक्य आहेत. मधुरिमाराजे भाजपकडून लढणार नाहीत, हे स्पष्ट झाल्यामुळेच देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना भाजपकडून बळ दिले जात आहे. सध्या सुरू असलेली फुटबॉल स्पर्धा व त्याचे शहरभर सुरू असलेले मार्केटिंग हा त्याच प्रयत्नांचाच भाग मानला जातो.
कार्यकर्ते ‘चार्ज’ पण पक्षातील गटबाजी उघडच! राष्ट्रवादीचा हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 1:12 AM
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने दोन दिवस कोल्हापुरात केलेल्या हल्लाबोल आंदोलनाने आत्मविश्वास गमावून बसलेले कार्यकर्ते ‘चार्ज’ झाल्याचे चित्र दिसले;
ठळक मुद्देउत्तम बांधणी केल्यास पाच विधानसभा मतदारसंघांत ‘हवा’