हातकणंगले -- दत्ता बिडकर हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी पारंपरिक विरोधक पक्षीय अजेंडा बाजूला ठेवून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आघाड्या करून राजकारण करण्यासाठी सरसावले आहेत. कालपर्यंत जातीयवादी पक्ष म्हणून हिणवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्तेसाठी शिवसेना-भाजप बरोबर हातमिळवणी करून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची गोची झाली आहे.तालुक्यात भाजपने जनसुराज्य, ताराराणी आघाडी आणि नव्याने दाखल झालेले जि.प.चे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांना नव्या राजकीय समीकरणानुसार भाजपने आपल्याकडे चासोबत घेऊन नवीन आघाडी केली आहे. या र जि. प. मतदारसंघ ठेवले आहेत. शिरोली आमदार अमल महाडिक यांच्या सौभाग्यवती शौमिका महाडिक यांच्यासाठी, तर हातकणंगले अरुण इंगवले यांच्यासाठी, तसेच आमदार सुरेश हाळवणकर यांनी कोरोची व कबनूर कार्यकर्त्यांच्या सोयीकडे ठेवल्याने भाजपच्या पदरी फक्त हातकणंगले मतदारसंघ वाढीव मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपकडे शिरोली, कोरोची, कबनूर हे हक्काचे मतदारसंघ होते. भाजपच्या नव्या आघाडीमधील ताराराणी आघाडीसाठी कुंभोज, हुपरी व रेंदाळ हे तीन मतदारसंघ सोडले आहेत. ताराराणी आघाडीने रुकडी आणि पट्टणकोडोलीवर हक्क सांगितला होता. मात्र, ऐनवेळी आघाडीत समाविष्ट झालेल्या धैर्यशील माने यांच्यासाठी हे मतदारसंघ सोडल्याने महादेवराव महाडिक यांची खदखद वाढली आहे. या आघाडीतील जनसुराज्य पक्षासाठी घुणकी व भादोले हे मतदारसंघ सोडले आहेत. त्यांचा हातकणंगले किंवा कुंभोजसाठी आग्रह आहे. तालुक्यात भाजप आणि मित्र पक्षांच्या आघाडीविरुद्ध काँग्रेस- राष्ट्रवादीसह शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी आघाडी आकाराला येत आहे. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला जातीयवादी संबोधले, त्याच शिवसेनेबरोबर आघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी जोर, बैठका मारत आहे. तालुक्यातील ११ जिल्हा परिषद आणि २२ पंचायत समिती गणांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाची एकट्याने निवडणुका जिंकण्याची परिस्थिती नाही. एकमेकांवर आगपाखड करणारे, जातीयवादी शक्तींना पाठबळ देणारे, निवडणुका आल्या की फक्त आपले आणि नात्यागोत्याचे राजकारण करणारे, पक्षाचा अजेंडा बाजूला ठेवून गटातटाचे लेबल चालवणारे पारंपरिक विरोधक असूनही गळ्यात गळे घालून नव्या आघाड्या करून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करणाऱ्या आणि मतदार आणि कार्यकर्ते आपलेच असल्याचे गृहीत धरून राजकारण करणाऱ्या नेतेमंडळींना या निवडणुकीत किती जनाधार मिळणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.
नव्या राजकीय समीकरणामुळे कार्यकर्ते संभ्रमात
By admin | Published: January 24, 2017 12:39 AM