संतोष बामणे।उदगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या वर्षात ऊस दरानंतर सोमवार (दि. ९) पासून गायीच्या दुधाला दर मिळण्यासाठी आंदोलनाची घोषणा केली होती. याला प्रतिसाद देत राज्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. तसेच मुंबई येथील दूध रोखल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात चक्काजाम करून आंदोलन केले. अखेर सरकारने गुरुवारी दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर जाहीर केल्यानंतर हे आंदोलन यशस्वी झाल्याने स्वाभिमानीचे कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत. त्यामुळे लोकसभा व विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे चित्र आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेल्या सोळा वर्षांपासून औद्योगिक वसाहत, ऊस दर व दूध दरासाठी पुढाकार घेऊन राज्यातील शेतकºयांना न्याय देण्याचे काम खासदार राजू शेट्टी यांच्या माध्यमातून झाले आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये खासदार शेट्टी यांनी देशातील १८२ शेतकरी संघटना एकत्रित करून लोकसभेत शेतीमालाला हमीभावासह तीसहून अधिक मागण्यांचे विधेयक मांडण्यात आले आहे. त्यामुळे राज्याच्या नेतृत्वाबरोबरच देशाचे नेतृत्व करताना खासदार शेट्टी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
राज्यात कोल्हापूर वगळता अन्य जिल्ह्यात १३ ते १८ रुपयेपर्यंत गायीच्या दुधाला भाव मिळत होता. फक्त कोल्हापूर जिल्ह्यात २३ रुपयेप्रमाणे दर दिला जात होता. मात्र, गेल्या वर्षभरापासून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात गायीच्या दुधासाठी आंदोलन सुरू होते. मात्र, गायीच्या दूधप्रश्नी शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नव्हती. गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात सर्वत्र अतिरिक्त दुधाचा प्रश्न व पाण्याच्या बाटलीपेक्षाही कमी दराने प्रतिलिटर दुधाची किंमत पाहता शेतकºयांच्या हातात काहीच राहात नव्हते. या अनुषंगाने जून महिन्यात पुणे दूध आयुक्तालयावर मोर्चा काढून स्वाभिमानीने निवेदन दिले होते.
या पार्श्वभूमीवर सोमवार (दि. ९) पासून पुकारलेल्या राज्यव्यापी ‘दूध बंद’ला राज्यातील शेतकºयांनी पाठिंबा दिल्यामुळे स्वाभिमानीच्या माध्यमातून अखेर दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर मिळाला आहे. त्यामुळे सर्वत्र जल्लोषी वातावरण असले तरी शिरोळ तालुक्यासह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना रिचार्ज मिळाला आहे. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीची रंगीत तालीमच असल्याची चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर खासदार शेट्टी यांनी आंदोलनाच्या माध्यमातून राज्यात आपला वरचष्मा कायम राखला आहे.हातकणंगले, बुलढाणा केंद्रस्थानीखासदार शेट्टी दहा वर्षे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हातकणंगलेतून शेट्टी यांच्याविरोधात सर्व पक्षांकडून उमेदवारांची शोधाशोध सुरू आहे.तर स्वाभिमानीचे रविकांत तूपकर यांनी बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे दूध आंदोलनाच्या माध्यमातून हातकणंगले व बुलढाणा मतदार संघ केंद्रस्थानी राहणार असून, यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी जितके करता येईल, तितके मी देण्याचा प्रयत्न केला आहे.. सध्याचे सरकार हे शेतकºयांसाठी कोणतीही ठोस पावले उचलत नाही. त्यासाठी आंदोलनाचे हत्यार हाती घ्यावे लागत आहे. सध्याची दूध दरवाढ सरकारने केली. त्याची योग्य अंमलबजावणी न झाल्यास सप्टेंबरमध्ये आंदोलनाच्या लढ्यासाठी सज्ज राहणार आहे.- खासदार राजू शेट्टी