कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या वादातून सोमवारी (दि. २६) कदमवाडी, विचारेमाळ परिसरात राजू लाटकर व सत्यजित ऊर्फ नाना कदम यांच्या समर्थकांत झालेल्या राड्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी ‘राष्ट्रवादी’ शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक राजू लाटकर, महेश जाधव यांच्यासह अकरा कार्यकर्त्यांना अटक केली. या संशयितांवर गंभीर गुन्हे दाखल असूनही शाहूपुरी पोलिसांनी लाटकरसह सर्वच आरोपींना ‘व्हीआयपी’ वागणूक दिली. स्पेशल चहासह गरमागरम कांदाभजी खाण्यास दिल्याने पोलीस दलाच्या अब्रूचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले. संशयित आरोपी राजेश लाटकर (शिवाजी पार्क), महेश जाधव, वसंत पुजारी, पप्पू ऊर्फ इम्रान पठाण, अमर मोरे, विशाल चव्हाण, अय्याज फकीर, राहुल पाटील, विकास सावंत, अमोल तरणाळ, विनोद तातोबा भोसले अशी त्यांची नावे आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टाकळकर यांच्यासमोर हजर केले असता त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली. महापालिका निवडणूक प्रचाराच्या वादातून राष्ट्रवादी काँग्रेस व ताराराणी आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये राडा झाला. राजू लाटकर यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने त्यांच्या समर्थकांनी नाना कदम यांच्या कार्यालयावर हल्ला चढवीत वाहनांची व साहित्याची तोडफोड केली. याला प्रत्युत्तर म्हणून कदम यांच्या समर्थकांनी लाटकर यांच्या विचारेमाळ येथील कार्यालयासह कदमवाडीतील बंगल्यावर हल्ला चढवीत तोडफोड केली. लाटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ताराराणी आघाडीचे संशयित सुहास लटोरे, सुनील कदम, आशिष ढवळे, उदय इंगळे, सत्यजित कदम, सुजित कदम, शशिकांत कदम यांच्यासह दीडशे कार्यकर्त्यांवर तसेच शशिकांत शिवाजीराव कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित राजू लाटकर, महेश जाधव, वसंत पुजारी, पप्पू पठाण, विशाल चव्हाण, आदींसह वीस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, राजू लाटकर, महेश जाधव यांच्यासह अकरा कार्यकर्ते शुक्रवारी बाराच्या सुमारास स्वत:हून हजर झाले. या सर्वांना गुन्हे शाखेच्या व्हरांड्यात बसविले होते. लाटकर यांना पोलिसांनी स्वतंत्र खुर्ची बसण्यास दिली होती. त्यांच्या पाठीमागे व समोर त्यांचे कार्यकर्ते बसून होते. लवकर कोर्टात हजर करण्यासाठी ते पोलिसांना दरडावत होते. यावेळी उशीर होत असल्याचे लक्षात येताच ड्युटीवरील पोलिसांनी स्पेशल चहा व गरमागरम कांदाभजी या संशयितांना आणून दिली. इतरवेळी साध्या किरकोळ मारहाणीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना हाता-पायाला बेड्या ठोकून जमिनीवर बसविले जाते. काहीवेळा पट्ट्यानेही ठोकले जाते; परंतु या आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल असूनही केवळ राजकीय दडपणाखाली त्यांना ‘व्हीआयपी’ वागणूक देत शाहूपुरी पोलिसांनी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी)
लाटकरांसह कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ‘व्हीआयपी’ वागणूक
By admin | Published: November 07, 2015 12:23 AM