राधांनगरी अभयारण्याचे अंगभूत सौंदर्य व परिसरातील ऐतिहासिक ठेव्यांमुळे याला जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्य शासनाने नुकतीच याच्या ११० कोटींच्या पर्यटन विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. या माध्यमातून होणाऱ्या विकासामुळे नजीकच्या काळात येथे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ निर्माण होईल, असे प्रतिपादन अभिनेते व राज्याचे पर्यटन ब्रँड अॅम्बेसेडर मिलिंद गुणाजी यांनी केले. त्यांनी या परिसराला भेट दिली. यावेळी गैबी येथील जेनिसिस इन्स्टिट्यूट येथे सत्कारप्रसंगी ते बोलत होते.
राज्याला पर्यटन विकासाची आस असलेले मुख्यमंत्री व पर्यावरण संवर्धनाची तळमळ असलेले पर्यावरणमंत्री लाभले आहेत. त्यामुळे या क्षेत्रात भविष्यात चांगले काम झालेले पाहायला मिळेल, असा विश्वास श्री गुणाजी यांनी व्यक्त केला. माजी शिक्षण समिती सभापती अभिजित तायशेटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दीपक शेट्टी, अनिल बडदारे, नितीन केरकर, सचिन बोंबाडे, रूपेश बोंबाडे, किरण पारकर आदी उपस्थित होते.