अभिनेता सागरच्या कुटूंबियांना चंद्रकांतदादांकडून मदतकोल्हापूर : राजर्षी शाहूंची भूमिका साकारताना रंगमंचावरच एक्झिट घेतलेला अभिनेता सागर चौगुले याच्या कुटूंबियांची शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी सागरची पत्नी वनिता चौगुले यांना शासकीय नोकरी देण्याचे जाहीर केले. पुण्यात ३ तारखेला राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत अग्निदिव्य नाटक सादर करताना अभिनेता सागर चौगुलेचा ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर दोनच दिवसांनी त्याला उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक जाहीर झाले. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सागर चौगुलेच्या कुटूंबियांना विशेष पुरस्काराद्वारे आर्थिक मदत करण्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राजारामपूरी येथील सागरच्या घरी जावून त्याची आई, पत्नी व मुलीची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी चंद्रकांतदादांनी स्वत: पुढाकार घेवून पत्नी वनिता यांना शासकीय सेवेत रुजू होण्याचा प्रस्ताव दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांना रिक्त पदांची चाचपणी करुन वनिता यांना रुजु करुन घेण्यासाठी कार्यवाही सुरु करण्याचे आदेश दिले. कोल्हापुरातील रंगकर्मी व विविध संस्थांच्यावतीने सागरच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. हा संदर्भ घेत पालकमंत्र्यांनी उपस्थित कलावंतांना तुमच्याकडून शक्य तितकी अधिकाधिक रक्कम जमा करा शासनाच्यावतीनेही भरीव निधी दिला जाईल असे सांगितले. यावेळी निर्माते पद्माकर कापसे, दिग्दर्शन सुनील माने, प्रकाश पाटील उपस्थित होते. खासदार महाडीक यांनीही केले सांत्वन चंद्रकांतदादांच्यानंतर खासदार धनंजय महाडीक यांनीही सागरच्या कुटूंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी रंगकर्मींनी मदतनिधी लवकरात लवकर सागरच्या कुटूंबियांना मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
अभिनेता सागरच्या कुटूंबियांना चंद्रकांतदादांकडून मदत
By admin | Published: March 11, 2017 4:31 PM