कोल्हापूर : केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रम केला नाही, असा एक कलाकारही कोल्हापूर जिल्ह्यात सापडणार नाही. त्यामुळे प्रत्येक कलाकाराचे या नाट्यगृहाशी जिव्हाळ्याचे नाते. या नाट्यगृहाला आग लागल्याचे समजताच शहरातील कलाकरांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ज्या नाट्यगृहाने घडविले ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले पाहून कलाकारांनी अक्षरश: हंबरडा फाेडला. आग लागल्याची बातमी ऐकूनही कलाप्रेमी कोल्हापूरकर ओक्साबोक्सी रडले. ‘लोकमत’च्या पत्रकारांनाही ही घटना सांगताना अश्रू अनावर झाले.श्वेता मोकाशी, सचिन वावरे यांच्यासह अनेक कलाकार प्रवेशद्वाराबाहेर डोळ्यांत पाणी आणून इमारतीकडे पाहत होते. ज्या नाट्यगृहात पहिल्यांदा सादरीकरण केले, ज्याचा कोपरा ना कोपरा आम्हाला ज्ञात आहे ते नाट्यगृह अशा घटनेत काळाच्या उदरात जावे हे दुर्दैवी असल्याचे मोकाशी व वावरे यांनी सांगितले. केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाशी जोडले गेलेले होते. नाटक असो, लावणी असो, सत्कार समारंभ असो की, गाण्याचा कार्यक्रम असो. तिथे गेला नाही असा एकही कोल्हापूरकर नसेल. त्यामुळे प्रत्येकाचे या वास्तूशी जिव्हाळ्याचे नाते. आग नाट्यगृहाला लागली परंतु प्रत्येकाला आपल्याच कुटुंबाची काही तरी हानी झाल्याची भावना व्यक्त झाली.
खाऊ गल्लीतील गॅस सिलिंडर हलविलेनाट्यगृहाला आग लागल्याचे समजताच शेजारील खाऊ गल्लीतील स्टॉलधारक स्टॉलकडे धावले. आग पसरल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते या भीतीने त्यांची गाळण उडाली. त्यांनी तत्काळ खाऊ गल्लीतील प्रत्येक स्टॉलमधील गॅस सिलिंडर हलविले. प्रशासनानेही त्यांना मदत केली. जे स्टॉलधारक आले नाहीत त्यांचे शटर तोडून त्यातील सिलिंडर बाहेर काढण्यात आली.
स्थानिकांचीही घेतली मदतअचानक आग लागल्याने कोणत्या दिशेने अग्निशमन गाड्या आतमध्ये न्यायच्या हे प्रशासनालाही तत्काळ सुचत नव्हते. मात्र, स्थानिक नागरिक, दुकानदारांनी त्यांना याकामी मदत करत कोणत्या दिशेला काय आहे, गाड्या कोणत्या दिशेने न्यायच्या याकामी मदत केल्याने प्रशासनाला आगीवर लवकर नियंत्रण मिळविण्यात यश आले.