कोल्हापूर : आयुष्यभर रंगभूमी आणि रसिक मायबाप प्रेक्षकांची सेवा केलेल्या अभिनेत्री रसना ऊर्फ एकवीरा मेंगळे यांना उशिरा का असेना, न्याय मिळाला आहे. ‘लोकमत’मधील वृत्तानंतर त्यांचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने बंद करण्यात आलेले मानधन जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. वयाच्या नवव्या वर्षी चेहऱ्यावर मेकअप चढविलेल्या रसना यांनी आयुष्याची ४० वर्षे रंगभूमीची सेवा केली. नाटकाच्या प्रेमापोटी कधी संसार थाटला नाही. त्या गो. स. शिरगोपीकर यांच्या ‘अनंत संगीत मंडळी’ या नाटक कंपनीशी एकनिष्ठ राहिल्या. गोकुळचा चोर, झाशीची राणी, बालशिवाजी, आठवा अवतार, सोन्याची द्वारका, वत्सलाहरण, भाव तोची देव, शाब्बास बिरबल शाब्बास, दशावतार, गीत गाती ज्ञानेश्वर, तुका म्हणे वेगळा, परीक्षेपूर्वीच्या सात रात्री, बहरला पारिजात, पतिव्रता, नवमीची रात्र, संत नामदेव या नाटकांत त्यांनी कृष्ण, युवराज, मुक्ता, सईबाई, सत्यभामा, रेवती, तुकोबांची आवली अशा विविध भूमिका साकारल्या. आई, भाऊ, बहिणी यांचे निधन झाल्याने निवृत्तीनंतर त्या चंबुखडी येथील मातोश्री वृद्धाश्रमात राहिल्या. गेल्या आठ महिन्यांपासून आर. के.नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमात जीवन कंठत आहेत. मात्र,त्यांचा ठावठिकाणा माहीत नसल्याने अ. भा. मराठी नाट्य परिषदेने त्यांचे मानधन बंद केले. त्यामुळे त्यांच्या नशिबी हलाखीचे जगणे आले. त्यांची ही परिस्थिती विशद करणारी बातमी ‘लोकमत’च्या सोमवार (दि. १९)च्या अंकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेचे कार्याध्यक्ष व नियामक मंडळाचे सदस्य प्रफुल्ल महाजन यांनी परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अभिनेत्री रसना यांना मानधन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार त्यांना जानेवारीपासून पुन्हा मानधन मिळणार आहे. (प्रतिनिधी)रसना यांनी राहण्याचा पत्ता बदलल्याची माहिती नाट्यपरिषदेला मिळाली नव्हती; त्यामुळे त्यांचे मानधन बंद करण्यात आले होते. मात्र, मी ‘लोकमत’मधील वृत्तानंतर नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी जानेवारीपासून मानधन पुन्हा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. - प्रफुल्ल महाजन, नियामक व कार्यकारिणी सदस्य, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदथकीत मानधनही देणारअभिनेत्री रसना यांना नाट्यपरिषदेकडून दरमहा तीन हजार रुपये मानधन मिळायचे. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून ते बंद झाले. हे थकलेले मानधनही त्यांना देण्यात येणार आहे. रसना यांना हयातीचा दाखला मिळाला असून, जानेवारीपासून हे मानधन पूर्ववत सुरू होणार आहे.
अभिनेत्री रसना यांना मिळाला न्याय
By admin | Published: December 22, 2016 12:55 AM