कोल्हापूर : ज्या कर्मचाºयाला दारू पिण्यामुळे निलंबित केले, तोच कर्मचारी मंगळवारी खातेनिहाय चौकशी करणाºया महिला अधिकाºयासमोर दारू पिऊनच उपस्थित झाल्याने जिल्हा परिषदेच्या कागलकर हाऊसमध्ये अनेकांची पंचाईत झाली.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा कनिष्ठ सहायक राजेश पवार याला तीन महिन्यांपूर्वी कार्यालयामध्ये दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. त्याची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून खातेनिहाय चौकशी सुरू होती. यातील एक भाग म्हणून सहायक आयुक्त रश्मी खांडेकर या कोल्हापुरात आल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोरील कागलकर हाऊसमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांतील कर्मचाºयांची ही चौकशी सुरू होती.
यावेळी पवार याला बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र पवार चक्क दारू पिऊनच या चौकशीवेळी अधिकाºयांसमोर गेला. त्यामुळे त्याची अवस्था पाहून, अधिकाºयांनी पाचच मिनिटांत त्याची चौकशीची प्रक्रिया संपवून टाकली. पवार हा सोमवारी (दि. २६) संध्याकाळी प्रशासन विभागातील वरिष्ठांना भेटून ‘माझे निलंबन तेवढे रद्द करा,’ अशी विनंती करीत होता. तेव्हा ‘तू आधी दारू सोड, सर्व व्यवस्थित होईल,’ असेही त्याला सांगण्यात आले. ‘बायको-पोरांची शपथ, मी दारू पीत नाही,’ असे सांगून गेलेल्या पवार याने दुसºयाच दिवशी महिला चौकशी अधिकाºयांसमोर दारू पिऊनच उपस्थिती लावल्याने त्याच्या या वर्तणुकीची जिल्हा परिषदेच्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील २५ हून अधिक कर्मचाºयांची खातेनिहाय चौकशी सुरू असून, यातील अनेकांनी मंगळवारी अधिकाºयांसमोर आपली बाजू मांडली.